धाराशिव : जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून कीर्ती किरण पुजार यांनी आज, गुरुवारी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले. महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीचे आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांनी औपचारिकरीत्या कार्यभार स्वीकारला.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष म्हणूनही पुजार यांची जबाबदारी असेल. यामुळे मंदिर व्यवस्थापनासह जिल्ह्याच्या प्रशासकीय कामकाजावर त्यांची विशेष नजर राहणार आहे.
श्री तुळजाभवानी मंदिराचा २ हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करणे आणि या आराखड्याची अंमलबजावणी वेळेत आणि पारदर्शकतेने होणे, हे नवे जिल्हाधिकारी यांच्यासमोरील महत्त्वाचे आव्हान असेल. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयात बोकाळलेला भ्रष्टाचार रोखणे आणि प्रशासनाची कार्यक्षमता वाढवणे हेही त्यांच्या कारकीर्दीतील प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे.
पुजार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्राथमिक दिशा ठरवली. आगामी काळात जिल्ह्याच्या विकासासाठी प्रभावी निर्णय घेतले जातील, असे संकेत त्यांनी दिले आहेत.