राजकारणात निष्ठा आणि मैत्री कधी वैरात बदलेल, याचा नेम नसतो. कालपर्यंत जो ‘आपला माणूस’ म्हणून मिरवत होता, तोच आज सर्वात मोठा शत्रू बनून उभा ठाकतो. असंच काहीसं नाट्यमय वळण धाराशिवच्या राजकारणात आलं आहे. निमित्त ठरली आहे एक व्हायरल ऑडिओ क्लिप आणि त्यातून बाहेर आलेला खासदाराचा ‘तापलेला’ स्वभाव.
प्रकरणाचा केंद्रबिंदू: जमीन, पैसा आणि धमकी
एकेकाळी खासदार ओमराजे निंबाळकर यांचे कट्टर कार्यकर्ते असलेले आणि आता पुण्यात स्थायिक झालेले उद्योजक दिनेश मांगले यांनी थेट खासदारांविरोधातच आरोपांची तोफ डागली आहे. मांगले यांच्या म्हणण्यानुसार, कथेची सुरुवात होते एका जमिनीच्या व्यवहारातून. खासदारांचे बंधू डॉ. जयराजे निंबाळकर यांनी मांगले यांच्या नावावरील प्लॉटवर तब्बल तीन कोटी रुपयांचे कर्ज उचलले आणि वरकरणी तोच प्लॉट परस्पर विकून टाकला.
जेव्हा फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मांगले यांनी न्यायासाठी खासदारांना, अर्थात ओमराजेंना फोन लावला. पण तिथे त्यांना दिलासा मिळण्याऐवजी मिळाला तो अश्लील शिवीगाळ आणि धमकीचा डोस. “जास्त नादी लागू नकोस, तुझ्या नरडीचा घोट घेतो,” अशा शब्दात खासदारांनी सुनावल्याचा आरोप मांगले यांनी केला आहे. या संभाषणाची ऑडिओ क्लिप आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली असून, त्यावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
कोण आहेत हे दोघे?
दिनेश मांगले हे काही साधे कार्यकर्ते नाहीत. त्यांचा पूर्वेतिहास पाहता ते संघर्षाला नवीन नाहीत. पूर्वी त्यांनी माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यक्रमात गोंधळ घातल्याची नोंद आहे, इतकेच नाही तर पुण्यातील एका गुंड टोळीलाही ते नडले होते. असा हा ‘डॅशिंग’ कार्यकर्ता एकेकाळी ओमराजेंचा खंदा समर्थक होता. मग असं काय बिनसलं की मैत्रीच्या नात्यात रक्ताच्या थारोळ्याची भाषा येऊ लागली?
दुसरीकडे, खासदार ओमराजे निंबाळकर. त्यांचा स्वभाव हा एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारखा. एकीकडे मनमोकळे, लोकांमध्ये मिसळणारे, तर दुसरीकडे कमालीचे तापट. राग आला की समोर कोण आहे, याचे भान राहत नाही. अधिकाऱ्यांशी एकेरी भाषेत बोलणे, शिवराळ भाषा वापरणे, दमबाजी करणे हे त्यांच्यासाठी नवीन नाही, असे म्हटले जाते. पण यावेळी त्यांचा हाच स्वभाव त्यांच्या अंगलट आला आहे.
लोकप्रतिनिधीचा ‘तो’ल आणि जनतेचा ‘बोल’
एखाद्या लोकप्रतिनिधीने, जो लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करतो, त्याने अशी भाषा वापरणे कितपत योग्य आहे? हा प्रश्न आता सोशल मीडियावर विचारला जात आहे. मनमोकळेपणा आणि उद्धटपणा यात एक पुसटशी रेष असते. ओमराजेंनी ती रेष ओलांडली का, हा वादाचा मुद्दा आहे. त्यांच्या समर्थकांसाठी हा त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचा भाग असेल, पण विरोधक आणि तटस्थ नागरिकांसाठी हे एका लोकप्रतिनिधीला न शोभणारे वर्तन आहे.
सध्या तरी पुण्यातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. व्हायरल क्लिपच्या आधारे समाजमाध्यमांवर ‘न्याय’निवाडा सुरू झाला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस कसा करतात आणि येत्या काळात याचे राजकीय पडसाद कसे उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मात्र एक गोष्ट नक्की, या ‘क्लिप’च्या धमाक्याने धाराशिवच्या राजकारणात एक नवा वादळ नक्कीच निर्माण केले आहे.