धाराशिव – राज्यात महायुती सरकार आलं, पण मंत्रिपदांचं गणित सुटेना! कसातरी सुटलं, तर पालकमंत्रीपदाचा लपंडाव सुरू झाला. रायगड आणि नाशिकमध्ये अजूनही पदाची खुर्ची रिकामीच आहे. पण धाराशिवमध्ये मात्र गेल्या पाच वर्षांपासून ‘भावी पालकमंत्री’ ठरलेले आमदार राणा पाटील अजूनही ‘भावी’च राहिले आहेत!
आणि ‘अजून पालकमंत्री मिळालेला नाही का?’ असं विचारणारं जिल्ह्याचं नशीब एवढं भारी की थेट मुंबईकर प्रताप सरनाईक यांची वर्णी लागली! राजकारणात ‘संपत्ती’ वाढवण्यासाठी ओळखले जाणारे सरनाईक आता थेट धाराशिवच्या नशिबात आले.
ओमराजे-सरनाईक दोस्ती आणि ‘मंत्री प्रमाणपत्र’
पालकमंत्री सरनाईक आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे जिवलग मित्र. एकाच वेळी आमदार, मग वेगवेगळ्या पक्षांत; पण दोस्ती कायम. आता ओमराजे ठाकरे सेनेत असले, तरी पालकमंत्री सरनाईक यांनी त्यांना महायुतीचे ‘प्रमाणपत्र’ देऊन टाकलंय!
धाराशिव दौऱ्यात दोघं सोबत बसले, हास्यविनोद केले, गप्पा मारल्या आणि ‘आपण दोघेच असतो तर सरकारचंही काय गारंटी नसतं!’ अशा थाटात बैठक पार पडली.
सरकारी जागेत ओमराजेंचं ‘भक्त निवास’!
या साऱ्या घडामोडींमध्ये खासदार ओमराजे यांना अचानक पालकमंत्री कार्यालयात रूम मिळाली ! सरकारच्या योजनांनुसार खासदारांना संपर्क कार्यालय देता येतं, पण हा ‘योगायोग’ जरा वेगळाच वाटतोय!
गेल्या दोन पालकमंत्र्यांच्या काळात ओमराजेंना जागा मिळाली नाही, पण सरनाईक आले आणि लगेचच रूम मंजूर! आता धाराशिवमध्ये चर्चा सुरू झाली – “हा राजकीय जवळीकतेचा ‘प्रसाद’ आहे की केवळ दुर्मिळ योगायोग?”
भावी पालकमंत्री अजूनही पोस्टरवरच!
दरम्यान, राणा पाटील यांच्या समर्थकांनी ‘भावी पालकमंत्री’ म्हणून जी पोस्टरबाजी केली, ती आता धाराशिवमध्ये इतिहास घडवतेय! कारण ते अजूनही ‘भावी’च राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना आता पोस्टर बदलावं लागणार आहे – ‘भावी पालकमंत्री – सध्या प्रतीक्षेत!’
धाराशिवच्या राजकारणात पुढे काय होणार? ओमराजेंचा पुढचा ‘पायरी चढण्याचा’ प्लॅन काय? आणि राणा पाटील ‘भावी’तून ‘सध्याचे’ कधी होणार? या सगळ्यावर जिल्ह्यातील चर्चाविश्व फुलून गेलं आहे!