धाराशिव – राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता दोन दिवसांत लागू होण्याची शक्यता आहे. निवडणुकीची तारीख नोव्हेंबर महिन्यात असल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील सत्ताधारी आमदारांनी आपल्या मतदारसंघात नवीन कामाच्या उद्घाटनाचा धडाका लावला आहे. त्यात तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील हे आघाडीवर आहेत.
धाराशिव जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात धाराशिवचे आमदार कैलास पाटील हे विरोधी बाकावर असून त्यांचे स्थान तुलनेने सुरक्षित आहे. सत्ताधारी आमदारांमध्ये परंड्याचे तानाजी सावंत, तुळजापूरचे राणा जगजितसिंह पाटील आणि उमरग्याचे ज्ञानराज चौगुले यांना आगामी निवडणुकीत चुरसीचा सामना करावा लागणार आहे. विशेषतः, एकास एक लढत झाल्यास या तीन आमदारांचा पराभव होण्याची शक्यता आहे. परंतु तिरंगी किंवा चौरंगी लढत झाल्यास त्यांना सहज विजय मिळू शकतो.
जिल्ह्यातील परंडा मतदारसंघात सध्या एकास एक लढतीची शक्यता निर्माण होत आहे. शिवसेना (ठाकरे गट) सेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या आकस्मिक निधनामुळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाचे राहुल मोटे यांना महाविकास आघाडीच्या तिकिटावर लढण्याची संधी मिळू शकते.सावंत विरुद्ध मोटे अशी एकास एक लढत झाल्यास सोलापूरचे पार्सल परत जावू शकते.
तुळजापूर मतदारसंघात भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना सध्या ४० टक्के जनमताचा आधार आहे. जर या मतदारसंघात एकास एक लढत झाली तर राणा पाटील डेंजर झोनमध्ये येऊ शकतात. परंतु तुळजापूरमध्ये सध्या त्यांच्या विरोधात आठ उमेदवार उभे आहेत. या आठ उमेदवारांमुळे आणि महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता असल्यामुळे राणा पाटील यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे.
उमरगा मतदारसंघात विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या विरोधात सध्या कोणताही तुल्यबळ उमेदवार नाही, त्यामुळे या मतदारसंघातही त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. विरोधकांचे बळ नसल्याने चौगुले यांना सहज विजय मिळण्याची शक्यता आहे.
धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे, आणि संभाव्य निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होणार असल्याने सत्ताधारी आमदार आपल्या कामगिरीचा गाजावाजा करत आहेत. जिल्ह्यातील मतदारसंघातील सत्ता संघर्षाने राजकीय उत्सुकता वाढवली आहे. आगामी निवडणुकीत कोण बाजी मारेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.