कळंब – कळंब तालुक्यातील डिकसळ येथे एका महिलेवर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पवन भाऊराव वाघमारे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
ताईबाई पोपट चव्हाण (वय ३५, रा. डिकसळ) या महिलेवर हा हल्ला करण्यात आला. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास ताईबाई चव्हाण या डिकसळ येथे भुईमुगांचे शेगा घेत असताना आरोपी पवन वाघमारे हा पाठीमागून आला आणि त्याने कोणतेही कारण नसताना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याने लोखंडी कोयत्याने ताईबाई यांच्या हाताच्या अंगठ्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
या घटनेची माहिती मिळताच कळंब पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ताईबाई चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी पवन वाघमारे विरोधात भा.न्या.सं.कलम 118(2), 352 सह शस्त्र अधिनियम 4,25 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.