उस्मानाबादचं नामांतर अखेर धाराशिव करण्यात आलं आहे. 29 जून 2022 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर 14 जुलै 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाने महाविकास आघाडी सरकारने केलेल नामांतराचा ठराव रद्द केला.परंतु 16 जुलै 2022 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर या प्रस्तावाला पुन्हा एकदा मंजुरी दिली होती. .24 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्र सरकारने औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिवला मंजुरी दिली.
शहराचं नाव धाराशिव करण्यात आले होते, परंतु तालुका आणि जिल्हा उस्मानाबाद असेच होते. उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करण्यात आल्यानंतर काही मुस्लिम नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असता, राज्य सरकारने फक्त शहराचं नाव बदलल्याचे सांगितले होते. त्यामुळे न्यायालयाने तालुका आणि जिल्हा नामांतरबद्दल ज्या याचिका दाखल केल्या होत्या, त्या फेटाळल्या होत्या. ती संधी साधून राज्य सरकारने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला तालुका आणि जिल्ह्याचे नामांतर देखील धाराशिव केले. अखेर निजामाने लादलेले नाव शिंदे- फडणवीस – पवार महायुती सरकारने कायमस्वरूपी पुसून टाकले.
खरं तर उस्मानाबादचं पूर्वीचं नाव धाराशिव असंच होतं. निजामशाही मधील सातवा निजाम उस्मान अली खान याच्या नावावरून धाराशिव शहराचे नाव उस्मानाबाद करण्यात आले होते. नगर परिषदेच्या सुधारित नगर विकास योजनेच्या प्रकरण एक मध्ये उस्मान अली खान यांनी सन 1900 साली धाराशीव हे नाव बदलून उस्मानाबाद केलं, असा उल्लेख आहे.तर 1998 मध्ये औरंगाबाद खंडपीठात दाखल झालेल्या याचिकेत, 1904 साली तत्कालीन लोकप्रिय राजा तिसरे खलिफा हजरत उस्मान राझी अल्लाह यांच्या नावावरून नामांतर केलं असल्याचं नमूद केलेलं आहे. तेव्हापासून म्हणजेच 1904 पासून आजतागायत या गावाचे नाव उस्मानाबाद असल्याचा उल्लेख आहे.
राज्य सरकारने धाराशिव नामांतरबाबत राजपत्र प्रसिद्ध करुन अधिसूचना जारी करताच, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी तातडीने अंमलबाजवणी करून, जिल्हाधिकारी कार्यालयावरील उस्मानाबाद नाव पुसून धाराशिव केले. जिल्हा परिषदेने देखील एक परिपत्रक काढून यापुढे धाराशिव नाव वापरण्याचे निर्देश दिले. माहिती कार्यालयाने देखील धाराशिव हेडलाईनखाली बातम्या सुरु केल्या. उद्या १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्रामचा अमृत महोत्सव आहे. त्यामुळे प्रशासनाने जोरदार हालचाली करून, पाट्या बदलून टाकल्या. ज्या जलदगतीने पाट्या बदलण्यात आल्या त्या गतीने आता विकास होण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्रात मराठवाडा आणि मराठवाड्यात उस्मानाबाद नव्हे धाराशिव सर्वात मागास जिल्हा म्हणून ओळखला जात होता. सबके बाद उस्मानाबाद अशी जिल्ह्याची ओळख होती. तुळजाभवानी आणि हवा पाणी असे म्हटले जात होते, आता हवा दूषित झाली आहे तर कोरड्या दुष्काळामुळे पाणी मिळणे दुरापस्त झाले आहे. नीती आयोगाच्या मागास यादीत उस्मानाबादचा तिसरा नंबर आला होता. आता उस्मानाबादचे नामांतर धाराशिव केले असले तरी मागासलेपणाचा शिक्का पुसून टाका.
धाराशिव जिल्हा अनेक घोटाळ्याने सध्या गाजत आहे. धाराशिव नगर पालिकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी सात गुन्हे दाखल आहेत. तत्कालीन मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे कारागृहात जेलची हवा खात आहेत. सहा ते सात अधिकारी , कर्मचारी रडारवर आहेत.त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. शहर बकाल झाले आहे . पाच वर्षात आलेला सहाशे कोटींचा निधी कोणाच्या घश्यात गेला, याची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र एसआयटी नेमण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेत पद भरती घोटाळा झाला आहे. जिल्हा रुग्णालय नावाला उरले आहे. मेडिकल कॉलेज होवून देखील साधी पित्ताची गोळी आणि ors मिळत नाही. येथील प्रतिनियुक्तीमुळं डॉ.राजाभाऊ गलांडे ची उचलबांगडी झाली. नायब तहसीलदार राजाराम केलुरकर यांना लाच प्रकरणी अटक झाली. पोलीस खात्यातील अनेक जण गुटखा तस्करीत अडकले. वसंतदादा बँकेतील घोटाळा गाजत आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक, दूध संघ बुडाला आहे. असे एकही खाते नाही तिथं भ्रष्टाचार नाही. जिल्हा बदनाम झाला आहे.
इतर शहरे पाहिले आणि ( उस्मानाबाद ) धाराशिव पाहिले की आपण अजून किती मागे आहोत हे दिसून येते. ( उस्मानाबाद) धाराशिव पासून १९८२ ला वेगळा झालेला लातूर जिल्हा कुठल्या कुठे गेला. आपण आहे त्या ठिकाणी आहोत. या जिल्ह्यात कोणताही अधिकारी यायला नको म्हणतो, पण एकदा आला की जायला नको म्हणतो. कारण या जिल्ह्यात खाबुगिरी जास्त आणि विकास कमी आहे. राजकीय पुढाऱ्यांना विकास नव्हे टक्का हवा आहे. एकाही नेत्याकडे विकासाचे व्हिजन नाही. खालच्या पातळीवरील राजकारण सुरु आहे. आरोप आणि प्रत्यारोप करण्यापलीकडे राजकारणी काही करत नाहीत. जनता डोळे असून, गांधारीप्रमाणे पट्टी बांधून बसली आहे. आमचा जीव – धाराशिव नक्की म्हणा पण आता तेवढं विकासाचं बघा… केवळ भावनिक राजकरण करून पोट भरत नाही. त्यासाठी रोजगार निर्मिती हवी.
– सुनील ढेपे
संपादक, धाराशिव लाइव्ह
मो. ७३८७९९४४११