धाराशिव: नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर धाराशिव शहरातील शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाचे कट्टर, एकनिष्ठ कार्यकर्ते आणि खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे पंकज पाटील यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. पाटील यांनी थेट आमदार-खासदारांना टॅग करत “मला कोणीही गृहीत धरू नये” अशी फेसबुक पोस्ट केली आहे. इतकेच नाही, तर त्यांनी फेसबुकवरून आमदार आणि खासदारांसोबतचा आपला फोटोदेखील हटवल्याने हा अंतर्गत तणाव आता चव्हाट्यावर आला आहे.
पंकज पाटील हे शिवसेनेचे संकटसमयी पक्षासाठी जिवाची बाजी लावणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये संपूर्ण निवडणूक यंत्रणा सांभाळणे आणि विजयाचे गणित बसवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. असे असतानाही, नुकत्याच सुरू झालेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या प्रक्रियेत त्यांनाच डावलण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
ही चर्चा सुरू असतानाच, पंकज पाटील यांनी उचललेले पाऊल धक्कादायक मानले जात आहे. त्यांनी फेसबुकवरील आमदार आणि खासदारांसोबतचा आपला फोटो हटवून एकप्रकारे ‘नाराजी’च व्यक्त केली. त्यानंतर “मला कोणीही गृहीत धरू नये” हा थेट इशारा देणारी पोस्ट लिहून त्यांनी ती खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना टॅग केल्याने, पक्षातील अंतर्गत वाद उघड झाला आहे.
पक्षासाठी दिवस-रात्र काम करणाऱ्या कार्यकर्त्यालाच का डावलले जात आहे? यामागे नेमका कोणाचा हस्तक्षेप आहे? असे प्रश्न आता पाटील यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर विचारले जात आहेत. समर्थकांमध्ये आणि मित्रपरिवारात या घटनेवरून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत पंकज पाटील यांची ही नाराजी शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या समीकरणांवर मोठा परिणाम करू शकते, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.







