परंडा – परंडा शहरात अवैध गोमांस वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रुई रोड परिसरात एका एर्टिगा कारमधून तब्बल १००० किलो गोमांस जप्त करण्यात आले असून, याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी गाडीसह एकूण ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई बुधवारी, १८ जून रोजी सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास बावची शाळेच्या पुढे रुई रोडवर करण्यात आली. परंडा पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, काळ्या रंगाच्या एर्टिगा कारमधून (क्र. एमएच १४ ईएच ३०३०) अवैध मांसाची वाहतूक होत होती. पोलिसांनी सापळा रचून गाडी थांबवली आणि तपासणी केली.
गाडीची तपासणी केली असता, त्यात २ लाख रुपये किमतीचे १००० किलो गोवंशीय जनावरांचे मांस आढळून आले. हे मांस अवैध कत्तल करून विक्रीसाठी नेले जात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी मांस आणि वाहतुकीसाठी वापरलेली कार असा एकूण ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी मुद्दशीर इब्राहिम कुरेशी (वय २४), मुद्दशीर खाजा शेख (वय २५), आणि सरुराज बब्बु कुरेशी (वय ३४, सर्व रा. कुरेशी गल्ली, परंडा) या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात सरकारतर्फे महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाच्या कलम ५(क), ९, आणि ९(अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.