परंडा – परंडा तालुक्यातील भोत्रा येथे सीना नदीच्या पात्रात जुन्या वादाच्या कारणावरून एका इसमाला रस्त्यात अडवून लोखंडी रॉड व काठीने जबर मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नव्हे तर मारहाण करत खिशातील ९ हजार ३०० रुपयांची रोख रक्कम हिसकावून घेतली असून, याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
भोत्रा (ता. परंडा) येथील रहिवासी अजिनाथ सोमनाथ शेळके (वय ४६ वर्षे) हे ७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास सीना नदीच्या पात्रातून जात होते.
त्यावेळी गावातीलच स्वप्निल किसन पाटील, शुभम किसन पाटील आणि किसन बब्रुवान पाटील (सर्व रा. भोत्रा, ता. परंडा) यांनी त्यांना रस्त्यात अडवले. “मागे मला शिव्या का दिल्या?” या कारणाचा जाब विचारत आरोपींनी अजिनाथ यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी रॉड व काठीने बेदम मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्या शर्टच्या खिशातील ९ हजार ३०० रुपयांची रोख रक्कम बळजबरीने हिसकावून घेतली.
परंडा पोलिसांत तिघांवर गुन्हा नोंद
उपचार घेतल्यानंतर अजिनाथ शेळके यांनी ८ सप्टेंबर २०२६ रोजी परंडा पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी स्वप्निल पाटील, शुभम पाटील आणि किसन पाटील या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११९, १२६, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत.





