परंडा – आत्या आणि मामा यांच्या सांभाळावरून झालेल्या वादाचे पर्यवसान गंभीर हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना परंडा तालुक्यातील काटेवाडी येथे घडली आहे. गुरुवारी सकाळी एका कुटुंबातील व्यक्तीला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कुऱ्हाड, लोखंडी रॉड आणि काठ्यांनी मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या महिलांनाही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी अंबी पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी विनोद दत्तात्रय जाधव (वय ३९, रा. काटेवाडी, ता. परंडा) यांनी अंबी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी (दि. १७ एप्रिल २०२५) सकाळी सुमारे ९ वाजता काटेवाडी येथे आरोपी उमाजी हंबीरराव भांदुर्गे, शिवाजी हंबीरराव भांदुर्गे, नेताजी हंबीरराव भांदुर्गे (तिघे रा. भोंजा, ता. परंडा), शंकुतला वसंत गांगर्डे (रा. शेळगाव, ता. परंडा) आणि त्यांचे इतर पाच साथीदार यांनी गैरकायद्याची मंडळी जमवली.
आत्या व मामा यांना सांभाळण्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी विनोद जाधव यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, कुऱ्हाडीने, लोखंडी रॉडने आणि लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. या हल्ल्यात विनोद जाधव गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, भांडणाचा आवाज ऐकून फिर्यादीची पत्नी आरती, भावजय अल्का आणि आई विजयमाला या भांडण सोडवण्यासाठी पुढे आल्या असता, आरोपींनी त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर विनोद जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबी पोलिसांनी नऊ आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम १०९ (हत्येचा प्रयत्न), ११८(१) (गंभीर दुखापत), ११८(२) (घातक हत्याराने गंभीर दुखापत), ११५(२) (घातक हत्यारांसह दंगा), ३५१(२) (जीवे मारण्याची धमकी), ३५२ (मारहाण), १८९(२) (गैरकायदेशीर जमाव), १९१(२) (दुखापत करणे), १९१(३) (घातक हत्याराने दुखापत करणे), १९० (अन्यायकारक अडवणूक) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.