परंडा – परंडा शहरातील माळी गल्ली येथे शेतीच्या वादातून एका २४ वर्षीय तरुणाला लोखंडी रॉडसह लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या त्याच्या वडिलांनाही आरोपींनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एकाच कुटुंबातील चार जणांविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओंकार राजाराम शिंदे (वय २४, रा. माळी गल्ली, परंडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ही घटना १० मे २०२५ रोजी सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास माळी गल्लीत घडली. शेतीच्या जमिनीच्या वादातून आरोपी दत्ता भागवत शिंदे, सुरेखा भागवत शिंदे, दिपाली दत्ता शिंदे आणि ज्योती भिसे (सर्व रा. माळी गल्ली, परंडा) यांनी ओंकार यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले.
यावेळी ओंकार यांचे वडील भांडण सोडवण्यासाठी मध्ये आले असता, आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. तसेच, बाप-लेकाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेनंतर ओंकार शिंदे यांनी ११ मे २०२५ रोजी परंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी दत्ता शिंदे, सुरेखा शिंदे, दिपाली शिंदे आणि ज्योती भिसे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी परंडा पोलीस अधिक तपास करत आहेत.