परंडा – आरोग्य सेवा ही देवाची सेवा मानली जाते, पण परंडा उपजिल्हा रुग्णालयात मात्र ही सेवा ‘दमदाटी’ आणि ‘शब्दांचा मार’ बनून राहिल्याचे थरारक चित्र समोर आले आहे. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या युट्यूब पत्रकाराला मारहाण आणि खोट्या आरोपांची धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
रोसा येथील एका युट्यूब चॅनलचे बातमीदार समीर ओव्हाळ हे २९ मे रोजी आपल्या आजारी पत्नीला घेऊन परंडा उपजिल्हा रुग्णालयात गेले होते. तपासणीनंतर डॉक्टरांनी एक्स-रे करण्याचा सल्ला दिला. मात्र, वीज नसल्यामुळे एक्स-रे मशीन बंद होते. रुग्णालयात जनरेटर असतानाही ते सुरू न करण्यामागील कारण विचारले असता, तेथील कर्मचाऱ्यांनी उद्धटपणे उत्तर दिले.
ओव्हाळ यांनी या गोंधळाचा व्हिडीओ मोबाईलवर शूट करण्यास सुरुवात केली. त्यावेळीच ऑफिस सुप्रीटेंडेंट (OS) डॉ. विश्वेश कुलकर्णी घटनास्थळी आले आणि त्यांनी ओव्हाळ यांच्यावर व्हिडिओ काढल्याचा राग मनात धरून “खंडणी मागतोस” असा आरोप केला. इतक्यावरच न थांबता, “पायाने तुडवेन” अशी अत्यंत उद्दाम आणि धमकीजनक भाषा वापरण्यात आली.
व्हिडीओ व्हायरल, आरोग्य सेवांवर प्रश्नचिन्ह
संपूर्ण घटना ओव्हाळ यांनी रेकॉर्ड केली असून व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे परंडा उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी वृत्ती, प्रशासनाची कार्यपद्धती आणि रुग्णसेवेच्या गंभीरतेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
प्रशासनाकडून चौकशी अपेक्षित
या घटनेमुळे वैद्यकीय अधिकार्यांच्या जबाबदारीची आणि पत्रकारांवरील गुन्हेगारी स्वरूपाच्या आरोपांच्या गंभीरतेची चर्चा रंगली आहे. संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी होत असून, आरोग्य विभागाने याची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी पत्रकार संघटनांकडून केली जात आहे.
Vidio