परंडा : परंडा पोलिसांनी मंगळवारी पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई करत, कत्तलीच्या उद्देशाने गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक करणारा एक पिकअप ट्रक पकडला आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ गायी आणि २२ वासरांसह एकूण २६ जनावरांची सुटका केली असून, वाहनासह सुमारे ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
परंडा पोलीस पथक मंगळवारी, दि. ८ जुलै रोजी, पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास वारदवाडी-भूम रस्त्यावर गस्त घालत होते. यावेळी सिमा गुंजाळ यांच्या शेताजवळ त्यांना एक पिकअप वाहन (क्र. एमएच ११ बीएल ४४०९) संशयास्पदरीत्या जाताना दिसले. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता, आतमध्ये अत्यंत निर्दयतेने जनावरे कोंबल्याचे निदर्शनास आले.
या पिकअपमध्ये चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता ४ जर्सी गायी आणि २२ लहान वासरे कत्तलीसाठी नेली जात होती. पोलिसांनी तात्काळ वाहनचालकाला ताब्यात घेतले आणि जनावरांची सुटका केली. जप्त केलेल्या जनावरांची किंमत २ लाख १० हजार रुपये असून, वाहनासह एकूण मुद्देमालाची किंमत ५ लाख १० हजार रुपये आहे.
याप्रकरणी, पोलिसांनी सरकारतर्फे फिर्याद देत वाहन चालकाविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम आणि प्राणी परिवहन नियमांतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. सुटका केलेल्या सर्व जनावरांची रवानगी गोशाळेत करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.