तुळजापूर आणि परंड्यात खुलेआम सुरू असलेल्या ड्रग्जच्या विळख्याने आधीच समाजमन सुन्न झालेले असताना, बार्शी शहर पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईने एक वेगळेच आणि अत्यंत गंभीर चित्र समोर आणले आहे. एका बाजूला बार्शी पोलीस १३ लाखांचा मुद्देमाल, ज्यात एमडी ड्रग्ज, गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे आहेत, जप्त करून तीन आरोपींना (ज्यात दोघे परंड्याचे आहेत) गजाआड करतात; तर दुसऱ्या बाजूला परंडा पोलीस आणि धाराशिव स्थानिक गुन्हे शाखा त्याच परंड्यात सुरू असलेल्या ड्रग्ज विक्रीकडे अक्षम्य दुर्लक्ष करतात किंवा त्यांना अभय देतात की काय, असा संशय घेण्यास पुरेपूर वाव आहे.
गुरुवारी रात्री बार्शी पोलिसांनी परंडा रोड परिसरात सापळा रचून जी कारवाई केली, ती निश्चितच कौतुकास्पद आहे. असद देहलुज, मेहफुज शेख (दोघे परंडा) आणि सरफराज शेख (बार्शी) यांच्याकडून जप्त केलेला मुद्देमाल पाहता, हे प्रकरण किती गंभीर आणि खोलवर रुजलेले आहे, याचा अंदाज येतो. सुमारे २० ग्रॅम एमडी ड्रग्ज, पिस्तूल, काडतुसे आणि आलिशान कारसह १३ लाखांचा ऐवज जप्त होणे, हे केवळ किरकोळ विक्रीचे प्रकरण नाही, तर एका मोठ्या संघटित गुन्हेगारी टोळीकडे स्पष्ट निर्देश करते. बार्शी पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडेच आहे.
पण याच कारवाईने परंडा पोलीस आणि धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या भूमिकेवर अत्यंत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. ज्या परंड्यातून दोन ड्रग्ज पेडलर्स बार्शी पोलिसांच्या हाती लागतात, त्याच परंड्यात स्थानिक पोलिसांना या अवैध धंद्याची पुसटशी कल्पनाही नसावी, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. विशेषतः, जानेवारी २०२४ मध्ये परंडा पोलिसांनी इम्रान शेख आणि अन्वर अतार यांच्यावर केलेली कारवाई आणि नंतर जप्त केलेला पदार्थ एमडी नसून ‘कॅल्शियम क्लोराईड’ असल्याचा लावलेला शोध अत्यंत संशयास्पद आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक व्ही. एच. इज्जपवार, जे त्यावेळी परंडा पोलीस स्टेशनला होते, त्यांनी जुजबी कारवाई करून प्रकरण मुळापर्यंत न नेता उलट ‘क समरी’ दाखल करून गुन्हा रद्द करण्याची केलेली घाई, हे ‘पाणी नक्कीच कुठेतरी मुरत’ असल्याचे दर्शवते. ८ ग्रॅम संशयित एमडी अचानक कॅल्शियम क्लोराईड कसे होते आणि त्याचा अहवाल येईपर्यंत तपास थंड बस्त्यात का जातो? आता बार्शी पोलिसांनी त्याच परिसरातून एमडी ड्रग्ज जप्त केल्याने, पूर्वीचा ‘कॅल्शियम क्लोराईड’चा बनाव अधिकच संशयाच्या भोवऱ्यात सापडतो.
परंडा आणि तुळजापूर परिसरात ड्रग्जचे जाळे पसरत असताना स्थानिक पोलीस यंत्रणा ‘मूग गिळून गप्प’ का बसली होती? मुख्य म्होरक्या हाजी मस्तानवर कारवाई का होत नव्हती? दोन पेडलर्सना पकडण्यासाठी बार्शी पोलिसांना परंड्याच्या हद्दीपर्यंत यावे लागते, हे स्थानिक पोलिसांचे अपयश आहे की संगनमत? या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. अमली पदार्थांचा विळखा केवळ गुन्हेगारी वाढवत नाही, तर समाजाला, विशेषतः तरुण पिढीला पोखरून काढतो. अशा गंभीर प्रकरणात पोलिसांची उदासीनता किंवा अभय देणारी भूमिका ही समाजासाठी अत्यंत घातक आहे.
बार्शी पोलिसांनी केलेल्या कारवाईने या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची आशा निर्माण झाली आहे. आता गरज आहे ती या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची. केवळ अटक केलेल्या आरोपींवर कारवाई करून चालणार नाही, तर या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण आहे, त्यांना स्थानिक पातळीवर कोणाचे अभय होते, आणि पूर्वीच्या प्रकरणात ‘कॅल्शियम क्लोराईड’चा अहवाल कसा आला, याची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. परंडा पोलीस आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. जर कोणी अधिकारी दोषी आढळले, तर त्यांच्यावरही कठोर कारवाई व्हायला हवी. केवळ बार्शी पोलिसांच्या कारवाईवर अवलंबून न राहता, संपूर्ण यंत्रणेने आता तरी जागे होऊन अमली पदार्थांच्या या विळख्यातून समाजाला बाहेर काढण्यासाठी कंबर कसायला हवी. गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या ‘काळ्या मेंढ्यांना’ शोधून कायद्याचा बडगा दाखवणे, ही काळाची गरज आहे.
- सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह