परंडा: परंडा तालुक्यात वाळू चोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कुंभेजा भोंजा फाट्याजवळ सोनारी ते परंडा रोडवरून टिपर क्रमांक एमएच १३ सी.यु. ४४९२ मध्ये ४ ब्रास वाळू बेकायदेशीररित्या वाहतूक करताना तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये महेश उत्तम ताटे (रा. मानेगाव धाकटे, ता. बार्शी, जि. सोलापूर), ज्ञानेश्वर नामदेव चोरमले (रा. सोलापूर रोड, बार्शी, जि. सोलापूर) आणि बाळू प्रभु बंडगर (रा. बैराग फाटा जवळ, सोनारी ते परंडा रोड) यांचा समावेश आहे.
दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी पहाटे १ वाजता परंडा पोलिसांनी ही कारवाई केली. जप्त करण्यात आलेल्या वाळू आणि टिपरची एकूण किंमत ५ लाख रुपये असल्याचा अंदाज आहे.
पोलिस कॉन्स्टेबल सचिन सुभाष लेकुरवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७९(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.