तुळजापूर : तालुक्यातील बारुळ येथील शेतकरी सचिन प्रभाकर ढोंबरे (वय ३२) यांना एका पवनचक्की कंपनीच्या गुंडानी मारहाण केली होती. परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. यासाठी ढोंबरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात कुटुंबासह उपोषण केले असता मारहाण करणाऱ्या गुंडांवर कारवाई करण्याचे आश्वासन अतिरिक्त पोलीस अधीक्षक गौहर हसनयांनी दिले होते. अखेर याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण ?
सचिन प्रभाकर ढोंबरे या शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी जे.एस.डब्ल्यु पवनचक्की कंपनीला २० गुंठे जमीन भाडेपट्ट्याने दिली होती. मात्र कंपनीने ३० ते ३५ गुंठे जमिनीवर अतिक्रमण करून मोठ्या पवनचक्कीच्या गाड्या शेतातून नेल्या आणि झाडे तोडली. ढोंबरे यांनी याबाबत विचारणा केली असता, कंपनीचे कर्मचारी दादा पवार, अंकित मिश्रा, वैभव कदम आणि इतर पाच जणांनी त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी रॉडने हल्ला करून जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ११८(१), १९१(२), १९१(३), १९०, ३५२, ३५१(२), ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांवर कारवाई कधी होणार ?
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्यावर कारवाई केव्हा होणार ? असा प्रश्न विचारला जात आहे.