उमरगा: कराळी पाटी येथे ७ डिसेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास बलभिम लक्ष्मणराव माने (वय ६०, रा. कदेर) आणि त्यांच्या पत्नी यांची दोन मोटारसायकलवरील तिघांनी फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
बलभिम माने हे आपल्या पत्नीसह मोटारसायकलने कराळीकडे जात असताना तिघांनी त्यांना अडवले. स्वतःला पोलीस असल्याचे भासवत त्यांनी खोटे ओळखपत्र दाखवले आणि “काल रात्री येथे एका महिलेचे दागिने लुटून मारहाण झाली आहे, म्हणून तुमचे गळ्यातील सोने नाणे व्यवस्थीत सांभाळून तुमच्या जवळ ठेवा” असे सांगितले.
यामुळे माने दांपत्य गोंधळले आणि त्यांची दिशाभूल करून फसवणूक करणाऱ्यांनी त्यांच्या गळ्यातील ३९ ग्रॅम वजनाचे, ९८,७५० रुपये किमतीचे सोने नाणे घेऊन पळ काढला.
याप्रकरणी बलभिम माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३१९(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.