धाराशिव: धाराशिव शहरातील रस्त्यांची दुरवस्था दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे. काल, याच रस्त्यांच्या दुरवस्थेवर नागरिकांनी आमदार राणा पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. यानंतर आज, आमदार पाटील यांनी स्वतः रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना फटकार लगावली.
आर.पी. कॉलेज ते जिजाऊ चौक या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गटारी तुंबल्या आहेत. यामुळे गटारीचे पाणी रस्त्यावर वाहत असून नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठी त्रास सहन करावा लागत आहे. याच रस्त्याची पाहणी करताना नागरिक आणि दुकानदारांनी आमदार पाटील यांच्यासमोर प्रशासनावर तीव्र टीका केली. यानंतर आमदार पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता . मोरे यांना तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आणि गटारीचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले.
विसर्जन विहीर आणि समता कॉलनीतील महिला आणि तरुणांनीही रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत तक्रार केली. रस्त्यांची खराब स्थितीमुळे त्यांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार पाटील यांनी मुख्याधिकारी फड यांना तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे आणि कामाची गुणवत्ता सुधारण्याचे आदेश दिले.
यावेळी भाजपा नेते सुरेश देशमुख, नितीन काळे, सुनील काकडे, अमित शिंदे, युवराज नळे, राजसिंहा राजेनिंबाळकर, भाजप शहराध्यक्ष अभय इंगळे, युवराज राजेनिंबाळकर, अभिजित काकडे, पाडुरंग लाटे, चंद्रकांत काकडे, सुजित साळुंखे, अमोल राजे, दत्ता पेठे, बापू पवार, बिलाल रझवी, मेसा जानराव, पुष्पकांत माळाळे,आदी उपस्थित होते.