आई तुळजाभवानीच्या नावाने चांगभलं म्हणत लाखो भाविक ज्या पवित्र भूमीत नतमस्तक होतात, त्या तुळजापुरात गुरुवारी जे घडले ते केवळ धक्कादायक नाही, तर महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक नैतिकतेच्या चिंधड्या उडवणारे आहे. राज्याचे महसूल मंत्री येतात, त्यांचा सत्कार होतो, पण तो सत्कार करणारा हात कुणाचा? तर ‘ड्रग्स आणि मटका किंग’ म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या, तरुण पिढीला नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या प्रकरणातील प्रमुख आरोपीचा! आणि हे सर्व कोणाच्या नेतृत्वात घडते? तर स्थानिक आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या. आमदारसाहेब, लोकसभा निवडणुकीत पत्नीच्या झालेल्या सव्वातीन लाखांच्या दारुण पराभवातून तुम्ही काहीच शिकला नाहीत का? जनतेने दिलेला तो कौल होता, तुमच्या राजकारणाला दिलेली स्पष्ट नापसंती होती. पण त्यातून धडा घेण्याऐवजी, तुम्ही गुन्हेगारांना व्यासपीठावर मानाचे स्थान देऊन जनतेच्या जखमांवर मीठ चोळत आहात.
या कार्यक्रमाचे आयोजनच मुळी एका मोठ्या फसवणुकीवर आधारलेले होते. तुळजापूर विकास आराखड्यासाठी १६०० कोटींचा निधी मंजूर झाल्याचा डांगोरा पिटत, स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी हा सोहळा रचण्यात आला. वस्तुस्थिती ही आहे की, या आराखड्यासाठी अद्याप एक रुपयाचाही निधी सरकारकडून प्राप्त झालेला नाही. केवळ पोकळ घोषणांचा उत्सव साजरा करताना, निमंत्रक म्हणून एका ड्रग्स प्रकरणातील आरोपीचे नाव टाकण्याचे धाडस तुमच्यात येतेच कसे? विनोद गंगणे याच्याशी तुमचे ‘खास संबंध’ सर्वश्रुत असले तरी, त्याला जाहीरपणे मिरवून तुम्ही नेमका कोणता संदेश देऊ इच्छिता? की सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी तुम्ही कोणत्याही थराला जाऊ शकता?
या प्रकारातील ढोंगबाजी आणि निर्लज्जपणा इतका होता की, जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही प्रताप सरनाईक यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यांची अनुपस्थिती ही तुमच्या कृतीला दिलेली मूक संमती नव्हती, तर तो एक जाहीर निषेध होता. पण सत्तेच्या आणि स्वप्रसिद्धीच्या हव्यासापोटी तुम्ही इतके आंधळे झाला आहात की, तुम्हाला साधं आणि सोपं राजकारणही कळू नये? एका बाजूला सरकार ‘ड्रग्समुक्त महाराष्ट्र’ करण्याच्या गप्पा मारते आणि दुसऱ्या बाजूला त्याच सरकारचे मंत्री ड्रग्सच्या आरोपीकडून सत्कार स्वीकारतात, त्याला आपुलकीने जवळ घेऊन त्याची स्तुती करतात. हा निव्वळ विरोधाभास नाही, तर हा गुन्हेगारीला दिलेला राजाश्रय आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सरकारला विचारलेला प्रश्न अगदी योग्य आहे – “अशा कृतींमुळे ड्रग्सचे रॅकेट उद्ध्वस्त होईल की सामान्य जनता?”
कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी लोकांना पैसे वाटण्यात आले आणि नंतर ते पैसे न दिल्याने महिलांनी जो गोंधळ घातला, तो तुमच्या राजकारणाचा खरा चेहरा आहे. तोच तुमचा खरा ‘विकास’ आहे. तुमचा हा ‘इव्हेंट’ केवळ दिखावा आणि फसवणुकीवर उभा होता, हेच यातून सिद्ध होते. जेव्हा पत्रकारांनी या गंभीर प्रकाराबद्दल प्रश्न विचारले, तेव्हा महसूल मंत्र्यांनी मौन बाळगले आणि तुम्ही “पोलिसांचे शपथपत्र देतो” म्हणत पळ काढला. तुमचा पडलेला चेहरा आणि उत्तर देण्यास केलेली टाळाटाळ, हेच तुमच्या चुकीचे कबुलीजबाब होते.
आमदार राणा पाटील, जनतेला गृहीत धरण्याची चूक करू नका. लोकसभेच्या निकालाने तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली आहे. तुमच्या लाडक्या बहिणीमुळे तुम्ही वाचला असाल, पण जनतेच्या मनात तुमच्याबद्दल काय आहे, हे स्पष्ट झाले आहे. जनाची नाही, तर किमान मनाची तरी लाज बाळगा. ज्या तुळजाभवानीच्या आशीर्वादाने तुम्ही राजकारण करता, त्याच पवित्र भूमीला अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या हस्ते कलंकित करताना तुम्हाला काहीच कसे वाटले नाही? सत्ता येईल आणि जाईल, पण तुम्ही निर्माण केलेला हा काळा डाग तुमच्या राजकीय कारकिर्दीवरून कधीही पुसला जाणार नाही. जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून मिळवलेला मान हा खरा सन्मान नसतो, हे लक्षात ठेवा.
- सुनील ढेपे , संपादक, धाराशिव लाइव्ह