अणदूर, ता. तुळजापूर – रंगपंचमी म्हटली की रंगांची उधळण, धांगडधिंगा आणि मस्ती! पण अणदूरच्या पिढीजात परंपरेत मात्र एक भन्नाट ट्विस्ट आहे – इथे रंगांची बरसात तर होतेच, पण त्यासोबतच एक “जिवंत प्रेतयात्रा” देखील निघते!
गेली कित्येक वर्षे पुजारी गल्लीतील जय मल्हार तरुण मंडळ या प्रथेला जीव की प्राण म्हणून जपत आहे. यंदाही गावातल्या गल्लीबोळांतून ही अनोखी प्रेतयात्रा मिरवण्यात आली.
‘वैभवजींच्या’ मोक्षमार्गावर पुष्पा २ चा तडका!
यंदाच्या रंगपंचमीसाठी ‘वैभव येळकोट’ या २६ वर्षीय तरुणाची “प्रेत” म्हणून नेमणूक झाली. पण फक्त मढं बनून थांबून चालतंय का? तर नाही! गावभर त्याला खांद्यावर घेत फिरवण्यात आलं. समोर राम मोकाशे यांनी पारंपरिक पद्धतीने मडकं धरून शोकमुद्रा घेतली, पण मागच्या रांगेत मात्र ‘गम हे तर’ स्टाईलने हशा आणि टाळ्यांचा गजर सुरू होता.
यंदा हटके ट्विस्ट म्हणजे शुभम ढोबळे याने ‘पुष्पा २’ स्टाईल मेकअप करून शोभा वाढवली. “मैं झुकेगा नही!” म्हणत तो चालत असताना, बाकीच्या तरुणांनी “अरे बाबा, आता झुका नाही, तर संपलास!” म्हणत त्याला चिमटे काढले.
महिला अवतारात मस्तीची बरसात!
या प्रेतयात्रेत फक्त पुरुषच नाही, तर काही तरुणांनी साडी नेसून महिला अवतार धारण केला. अंकुश मोकाशे आणि नागेश कोळी यांच्या ‘लाजरी’ अदा पाहून गावकऱ्यांचे पोट दुखेपर्यंत हसू फुटले.
“दारू, जुगार, बिडी – सगळं टाळा नाहीतर पुढचं स्टेशन प्रेतयात्रा!”
ही प्रथा म्हणजे केवळ मस्ती नव्हे, तर एक समाजप्रबोधनही! दारू, जुगार, बिडी, व्यसन यामुळे माणूस हळूहळू संपतो, हे दाखवण्यासाठी या प्रेतयात्रेचा गावभर प्रचार केला जातो. “लय दारू पित होता… लै जुगार खेळत होता… लै बीडी ओढत होता… म्हणून आज त्याला प्रेतयात्रेत जायला लागलं!” अशा विनोदी पण मार्मिक घोषणांनी गावकरी आणि उपस्थितांना खळखळून हसायला लावलं.
“असं काहीतरी गावोगाव सुरू झालं तर व्यसनांवर फुलस्टॉप!”
अणदूरच्या या भन्नाट आणि समाजप्रबोधन करणाऱ्या परंपरेमुळे गावातील वातावरण आनंदी आणि जागरूकतेने भरलेलं होतं. गावकऱ्यांनी या उपक्रमाला दाद देत, “असं काहीतरी प्रत्येक गावाने केलं तर दारू-जुगारवाल्यांना झोप उडेल!” अशी मिश्कील टिप्पणी केली.
गावातील गल्लीबोळातून रंग-गुलालासह ही अनोखी यात्रा फिरत असताना, ‘पुष्पा २’ च्या स्टाईलमध्ये संदेश मिळाला – ‘व्यसन केलंत, तर पुढच्या वर्षी तुम्हीच आमच्या प्रेतयात्रेचे मानकरी व्हाल!’
व्हिडीओ पाहा