शिराढोण – नॅचरल शुगर कारखाना, रांजणी (ता. कळंब) येथून 30 टन साखर पाठवण्याच्या बहाण्याने लाखोंचा गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी फिर्यादी श्यामसुंदर उत्तमराव मोरे (वय 32, रा. आलेगाव, ता. कंधार, जि. नांदेड) यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी नसीर महमुद अहमद (रा. स्वार वरद, मोहला अगलागा रोड, रसुलपुर, रामपूर, उत्तर प्रदेश) याने दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 1.30 वाजता फिर्यादीशी संपर्क साधला. त्याने नॅचरल शुगर कारखान्यातून 30 टन साखर (किंमत अंदाजे 11,56,125 रुपये) राजा ट्रेडिंग कंपनी, प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथे पोहोचवण्यासाठी घेतली. यासाठी डिझेल ॲडव्हान्स स्कॅनरद्वारे घेतले. मात्र, संबंधित माल ग्राहकांकडे न पोहोचवता त्याने विश्वासघात करून फसवणूक केली.
ही बाब लक्षात येताच, फिर्यादीने 10 मार्च 2025 रोजी शिराढोण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 316(2), (3), 318(3), (4), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिराढोण पोलीस करीत आहेत.
ऊस तोडून देण्याचे पैसे घेऊन फसवणूक; शेतकऱ्याचा ऊस पेटवून देण्याचा प्रकार
आंबी – भुम तालुक्यातील कानडी येथे शेतकऱ्याची फसवणूक करून त्याचा ऊस पेटवून देण्याचा प्रकार समोर आला आहे. ऊस तोडण्यासाठी दिलेले पैसे घेऊनही काम न करता, शेतकऱ्याला जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याची तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणी आंबी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सुनिल लक्ष्मण ढवारे (वय 53, रा. पाथ्रुड, ता. भुम, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी पिंटू खरात (रा. साकत), कुमार गव्हाणे, जिवण गव्हाणे (दोघे रा. पिंपळगाव रामा), थोरात (रा. अंतरगाव), येडबा कसबे (रा. चिंचपूर, ता. भुम) यांनी दिनांक 7 मार्च 2025 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून 9 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत हा प्रकार केला.
फिर्यादीने या आरोपींना ऊस तोडणीसाठी पैसे दिले होते. मात्र, आरोपींनी ऊस तोडण्याऐवजी तो पेटवून दिला आणि त्याचे मोठे नुकसान केले. यावर फिर्यादी यांनी जाब विचारण्यासाठी गेले असता, त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच, जळालेल्या उसाचा काही भाग चोरून नेल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी फिर्यादी सुनिल ढवारे यांनी 10 मार्च 2025 रोजी आंबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम 318(4), 326(एफ), 303(2), 352, 351(2), 351(3), 189(2), 190 तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 3(2)(व्हिए), 3(1)(आर), 3(1)(एस) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास आंबी पोलीस करीत आहेत.