भूम : भूम तालुक्यातील बेलगाव येथील शेतात साठवून ठेवलेली सुमारे एक लाख रुपये किमतीची १५ ब्रास वाळू अज्ञातांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून शनिवारी (ता. २१) भूम पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेलगाव येथील शेत गट क्रमांक १०३ मध्ये सुमारे १५ ब्रास वाळूचा साठा करून ठेवण्यात आला होता. २६ जानेवारी २०२५ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या पूर्वी एखाद्या अज्ञात व्यक्तीने सक्षम अधिकाऱ्यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता या ठिकाणी बेकायदेशीरपणे उत्खनन केले. तसेच, येथे साठवून ठेवलेली एकूण ९९,८४० रुपये किमतीची वाळू चोरून नेली.
शासकीय मालमत्तेची चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर, तहसील कार्यालय भूम अंतर्गत येणाऱ्या गणेगाव सज्ज्याच्या ग्राम महसूल अधिकारी जया महादेव सुतार (वय ३३) यांनी शनिवारी (ता. २१ मार्च २०२६) भूम पोलिस ठाण्यात रीतसर प्रथम खबर (एफआयआर) दिली.
या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी वाळू चोरी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. महसूल विभागाने दिलेल्या या फिर्यादीमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा पुढील तपास भूम पोलिस करत आहेत.





