धाराशिव : ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करत, जिल्हाधिकारी कार्यालय यावर जाणीवपूर्वक कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे, माहिती अधिकार कार्यकर्ते भास्कर महादेव वारे यांनी दि. १० जून २०२५ रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. यासंबंधीचे निवेदन त्यांनी विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांना दिले आहे.
श्री. वारे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या कालावधीत जिल्हा जलसंधारण अधिकारी प्र.का. महामुनी यांनी ठेकेदारांशी संगनमत करून, प्रत्यक्षात कामे न करताच निधी उचलून शासनाची फसवणूक केली आहे. ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ या योजनेचा मूळ उद्देश तलावांमधील गाळ काढून पाणीसाठा वाढवणे आणि तोच गाळ शेतकऱ्यांच्या शेतीसाठी देऊन जमिनीची सुपीकता वाढवणे हा आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी जी.पी.आर. सिस्टीमचे (जिओटॅगिंग) खोटे आणि संपादित फोटो सादर करून, तसेच बनावट मोजमाप पुस्तिका तयार करून कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप वारे यांनी केला आहे.
या प्रकरणी यापूर्वी नेमलेल्या समितीनेही प्रत्यक्ष पाहणी न करता, जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांशी संगनमत करून शासनाला चुकीचा अहवाल सादर केला, असा दावाही त्यांनी केला आहे.
कारवाईसाठी टाळाटाळ आणि जीवितास धोका
वारे यांनी यापूर्वी २८ मार्च २०२५ रोजी माहिती अधिकारात या कामांची माहिती मागितली होती, जी त्यांना नाकारण्यात आली. याविरोधात त्यांनी केलेल्या प्रथम अपिलावरही सुनावणी घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यांनी १७ मे २०२५ रोजी जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्याकडे तक्रार दाखल केली होती, परंतु त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
जिल्हा जलसंधारण अधिकारी महामुनी यांचे राजकीय लागेबांधे असून ते गुंड प्रवृत्तीचे आहेत, असे नमूद करत वारे यांनी आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या जीवितास धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. काही बरेवाईट झाल्यास त्याला सर्वस्वी जलसंधारण अधिकारी प्र.का. महामुनी जबाबदार असतील, असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
दोषी अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करावे, अन्यथा १० जून २०२५ रोजी आत्मदहन करण्याच्या इशाऱ्यावर ते ठाम आहेत. या निवेदनाच्या प्रती त्यांनी मृदा आणि जलसंधारण विभाग, विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनाही कारवाईसाठी पाठवल्या आहेत.