धाराशिव – नळदुर्ग परिसरातील १५० हून अधिक गुंतवणूकदारांची सांगलीतील ‘भूमी पॉपकॉम लिमिटेड’ कंपनीने तब्बल दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कंपनीच्या पाच जणांविरुद्ध फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी आजतागायत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
आकर्षक व्याजदराच्या आमिषाने गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढले
या प्रकरणात तक्रारदार शाहेदाबी इक्कारअली सय्यद ( रा.नळदुर्ग ) यांना कंपनीच्या एजंट सुवर्णा शंभुलिंग बोंगरगे ( रा. अणदूर ) यांनी १३ टक्के अशा आकर्षक व्याजदराच्या आमिषाने ‘भूमी पॉपकॉम लिमिटेड’ कंपनीत पैसे गुंतवणुकीस प्रवृत्त केले होते. या आकर्षक योजनेमुळे सय्यद यांनी केवळ स्वतःच गुंतवणूक केली नाही, तर आपल्या ओळखीच्या अनेक व्यक्तींनाही या कंपनीत गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन दिले. सय्यद यांनी २०१२ ते २०१८ या कालावधीत तब्बल ३५.९ लाख रुपये कंपनीत गुंतवले. मात्र, सहा वर्षांच्या गुंतवणुकीनंतर, म्हणजेच परिपक्वतेनंतर कंपनीने पैसे परत करण्यास स्पष्ट नकार दिला.
कंपनीच्या वरिष्ठांकडूनही प्रतिसाद नाही
सय्यद यांनी आपले पैसे परत मिळवण्यासाठी कंपनीचे चेअरमन मनोज सुखदेव कदम, प्रविण शंकर मोवाडे आणि धनश्री मनोज कदम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोन उचलला नाही आणि नंतर तर फोनच बंद केला. यावरून आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने सय्यद यांनी नळदुर्ग पोलिसांत ५ फेब्रुवारी २०२४ रोजी तक्रार दाखल केली.
गुन्हा दाखल, पण अटक नाही
पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत सुर्वणा शंभूलिंग बोंगरगे, कंपनीचे चेअरमन मनोज सुखदेव कदम, त्यांच्या पत्नी धनश्री मनोज कदम, शिवानंद रींगणे, प्रवीण गल्लाडे या पाच जणांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक) आणि ४०६ (विश्वासघात) नुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊन सहा महिने उलटून गेले तरीही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.नळदुर्ग पोलिसांनी आरोपीकडून चिरीमिरी घेतल्याची चर्चा सुरु आहे.
गुंतवणूकदार चिंतेत
या घटनेमुळे नळदुर्ग परिसरातील गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक गुंतवणूकदारांचे लाखो रुपये या कंपनीत अडकले आहेत. त्यांना आपले पैसे परत मिळतील की नाही याची चिंता सतावत आहे.या गुंतवणूकदारांनी आरोपीना अटक करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.