बेंबळी – तालुक्यातील सांगवी येथे शेतजमीन आणि घराच्या वादातून एका ७० वर्षीय वृद्ध पित्याला त्यांच्या मुलासह पाच जणांनी मिळून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ९ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.
पंढरी फुलचंद शिंदे (वय ७०, रा. सांगवी, ता. जि. धाराशिव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी पंढरी शिंदे यांचा त्यांचा मुलगा गोकुळ पंढरी शिंदे (सध्या रा. मुरुम, जि. लातूर) याच्यासोबत शेती आणि घरावरून वाद सुरू होता. ९ ऑगस्ट रोजी सकाळी गोकुळ शिंदे याने त्याचे साथीदार प्रथमेश गोविंद आंबाड (रा. लाडेगाव, ता. केज, जि. बीड), अनिकेत रामहरी मेंढेकर (रा. मुरुड, जि. लातूर), अनिल पाटील (रा. मुरुड, जि. लातूर) आणि अन्य एका अनोळखी व्यक्तीसह गैरकायद्याची मंडळी जमवून पंढरी शिंदे यांचे घर गाठले.
यावेळी आरोपींनी पंढरी शिंदे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी आणि काठीने जबर मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले असून, आरोपींनी त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेनंतर पंढरी शिंदे यांनी ११ ऑगस्ट रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलगा गोकुळ शिंदे यांच्यासह पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास बेंबळी पोलीस करत आहेत.