धाराशिव : राज्यातील शेतकरी विविध संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडला असून, त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीचा ठराव येत्या १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत मांडावा, असे आवाहन आमदार कैलास पाटील यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामसभांमधील ठराव एकत्र करून मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आमदार पाटील म्हणाले की, सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, तीन अधिवेशने झाली तरी सरकारने यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, महागडी खते व औषधे आणि उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात आहे. शेतमालाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे.
या परिस्थितीमुळे बहुतांश शेतकरी बँक आणि सावकारांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत. अनेकांना थकबाकीमुळे बँकांकडून नोटिसा येत आहेत, जप्तीच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे, तर काही शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. ही गंभीर परिस्थिती पाहता, शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी सरसकट कर्जमाफी हाच एकमेव तातडीचा आणि परिणामकारक उपाय आहे, असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
ही कर्जमाफी कोणत्याही अटी, निकष किंवा समितीच्या अभ्यासात वेळ न घालवता तातडीने जाहीर करावी. यामध्ये अल्प मुदतीचे पीककर्ज, मध्यम मुदतीचे सिंचन व उपकरण कर्ज, शेडनेट, पॉलिहाऊस, दूध उत्पादक शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज, तसेच सावकारी कर्जाचाही समावेश असावा, अशी मागणी या ठरावाद्वारे करण्यात यावी, असे आवाहन त्यांनी केले. १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाला दिलेल्या आश्वासनाची आठवण करून द्यावी, असेही ते म्हणाले.
या आहेत प्रमुख मागण्या
- संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जाहीर करावी.
- कर्जमाफीची अंमलबजावणी बिनशर्त, पारदर्शक आणि त्वरित करावी.
- कर्जमाफीसोबतच शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन शाश्वत शेती धोरण लागू करावे.