वाशी: तालुक्यातील घाटनांदूर शिवारात विद्युत खांबावरील ‘स्काडा’ (SCADA) केबल तोडून कंपनीचे ३ लाखांहून अधिक नुकसान केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २० जानेवारी रोजी सायंकाळी ६:३० ते २१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८:३० या दरम्यान घडली. घाटनांदूर शिवारातील गट नं. ६८०, ६५१ आणि ८४३ मधील ४ विद्युत खांबांवर बसवण्यात आलेली विद्युत मापक स्काडा केबल अज्ञात व्यक्तीने नुकसान करण्याच्या उद्देशाने तोडून टाकली. यामध्ये महावितरण कंपनीचे एकूण ३ लाख ६ हजार ५४९ रुपयांचे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी अमोल आश्रुबा मोटे (वय ४१, रा. गिरवली, ता. भूम, जि. धाराशिव) यांनी गुरुवारी (दि. २२) वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२४ (५) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वाशी पोलीस करत आहेत.
तामलवाडीतील इंडस टॉवरमधून एअरटेलचे फायबर चोरीला; ४० हजारांचे नुकसान
तामलवाडी: येथील इंडस टॉवर कंपनीच्या साईटवरून चोरट्यांनी ४० हजार रुपये किमतीचे एअरटेल कंपनीचे फायबर केबल चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरीची घटना ७ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री १२:०० ते १:२० या वेळेत घडली. तामलवाडी येथील इंडस टॉवर कंपनीच्या आवारातून अज्ञात व्यक्तीने एअरटेलचे अंदाजे ४० हजार रुपये किमतीचे फायबर चोरून नेले.
याप्रकरणी महादेव पंडित ढवण (वय ४२, रा. खंडाळा, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी गुरुवारी (दि. २२) पोलिसांत फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून तामलवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.






