नळदुर्ग – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला.
दयानंद पंडित भोसले (वय 43, रा. अणदुर) आणि प्रज्योत युवराज काळे हे दोघे मोटरसायकलवरून नळदुर्गहून अणदुरकडे जात होते. गोलाई चौकाजवळ त्यांच्या दुचाकीला एका ट्रकने (एमएच 13 एक्स 2762) मागून धडक दिली. या अपघातात दयानंद भोसले यांचा मृत्यू झाला, तर प्रज्योत काळे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला.
या घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी ट्रकचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी प्रदीप सम्रता भोसले यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
कळंब येथे रस्ता अपघातात वृद्धाचा मृत्यू
कळंब – कळंब शहरातील तहसील कार्यालयासमोर झालेल्या अपघातात एका 78 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. श्रीकृष्ण रंगनाथ पाडोळे असे या वृद्धाचे नाव आहे. ते मंगरुळ (ता. कळंब) येथे राहत होते.
पाडोळे तहसील कार्यालयासमोरुन पायी चालले होते. त्यावेळी तानाजी कारभारी घोळवे (रा. सोनारवाडी, ता. वाशी) यांच्या रिक्षाने (क्रमांक एमएच 25 एम 1385) त्यांना धडक दिली. या धडकेत पाडोळे गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पाडोळे यांचे नातेवाईक रामराजे श्रीकृष्ण पाडोळे यांनी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी रिक्षाचालक तानाजी घोळवे यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 281, 125 (अ), 125 (ब) आणि 106 (1) सह 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.