धाराशिव जिल्ह्यात शिक्षणक्षेत्रात चांगलीच धुरळपट्टी उडाली आहे! शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांच्या कामकाजावर मागासवर्गीय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण आयुक्त यांच्याकडे थेट तक्रार दाखल केली, आणि प्रकरण एवढं तापलं की मॅडमना अस्वस्थ व्हावं लागलं. धाराशिव लाइव्हने सातत्याने या विषयावर बोट ठेवताच मॅडमनी डॅमेज कंट्रोल सुरू केला.
सूत्रांच्या माहितीनुसार, शिक्षणाधिकारी साळुंके यांनी जिल्ह्यातील प्रमुख शैक्षणिक संस्था चालकांना गुप्तरीतीने बोलावलं. “अहो, हे असं चालणार नाही, ह्यांना धडा शिकवायला हवा!” असा माहोल तयार करत त्यांनी तक्रार करणाऱ्या संघटनेवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्याचा ‘सल्ला’ दिला. पण एवढ्यावरच थांबल्या नाहीत! इतर शिक्षक संघटनांना तातडीने पत्र लिहून, “आम्हाला काही तक्रार नाही,” असं लेखी द्यायला सांगितलं.
पण, पण, पण… संघटनांनी हा प्रस्ताव थेट धुडकावला! कुणीच या गाडीत बसायला तयार नाही. आता शिक्षणाधिकारी मॅडम यावर काय खेळी खेळणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे! धाराशिवच्या शिक्षण क्षेत्रात पुढे काय घडणार? धाराशिव लाइव्हवर राहा ऑन!
साळुंके मॅडम अडचणीत – जुन्या प्रकरणांवरून नवा स्फोट!
धाराशिव जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांच्याभोवती आरोपांची वादळं थांबायचं नाव घेत नाहीयेत! मागील काही महिन्यांत त्यांच्यावर गंभीर आर्थिक गैरव्यवहार, बदल्या प्रक्रियेत भ्रष्टाचार, शिक्षकांची पिळवणूक आणि बनावट पटसंख्या दाखवून शाळांना निधी मिळवून देण्याचे आरोप करण्यात आले होते. आता त्याच पार्श्वभूमीवर नव्या घडामोडी उघडकीस आल्या आहेत.
जुन्या आरोपांची झळ अजूनही कायम!
➡ शिक्षक बदल्यांमध्ये पैसे खेळवले गेले!
शिक्षकांच्या बदल्यांमध्ये आर्थिक व्यवहार होत असल्याचे आरोप मागील महिन्यांत करण्यात आले होते. एका सहशिक्षकाची बदली दोन महिन्यांपर्यंत रखडवून ठेवण्यात आली होती, तो शिक्षक आत्मदहनाच्या तयारीला गेल्यावरच निर्णय घेण्यात आला!
➡ बनावट विद्यार्थीसंख्या दाखवून निधी लाटला?
संघटनेने विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांची खोटी संख्येनोंद करून शासनाचा निधी लाटल्याचा आरोप केला होता. २५ विद्यार्थ्यांची शाळा भरभराटीत दाखवली जात होती, तर ६० विद्यार्थ्यांची पटसंख्या १०० पेक्षा जास्त असल्याचा बनाव केला गेला!
➡ अनधिकृत भरती आणि खंडणी?
शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणावर लाचलुचपत आणि बनावट नोकरभरती झाल्याचा दावा करण्यात आला होता. एका कर्मचाऱ्याची १० लाख रुपयांची लाच घेऊन बेकायदेशीरपणे नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा होती.
आता नवा ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न?
मागील प्रकरणांनी आधीच शिक्षणाधिकारी साळुंके यांच्यावर प्रश्नचिन्ह उभे केले असताना, आता त्यांनी संस्था चालकांना तक्रार करणाऱ्या संघटनेवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्यास सांगितले आहे! इतकंच नाही, तर इतर शिक्षक संघटनांना “आम्हाला काहीही तक्रार नाही,” असे लेखी प्रमाणपत्र देण्यास सांगितले. पण संघटनांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला!
धाराशिव जिल्ह्यात काय सुरू आहे?
साळुंके मॅडम यांच्यावर आधीपासून भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यावर पडदा टाकण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे प्रकरण शिक्षण क्षेत्राला कुठे घेऊन जाणार? धाराशिव लाइव्हवर राहा ऑन!