धाराशिव : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी, राज्य सरकारने धाराशिव शहरातील शासकीय दूध शीतकरण केंद्राची एक एकर जागा त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी मंजूर केली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार आहे.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी शासकीय दूध शीतकरण केंद्राची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. राज्य सरकारने या मागणीची दखल घेत गुरुवारी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी शासकीय दूध शीतकरण केंद्राची एक एकर जागा महसुल व वन विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला.
आमदार पाटील यांनी या निर्णयाबद्दल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि महायुती सरकारचे आभार मानले आहेत. तसेच, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यात योगदान देण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
यापूर्वीच अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व स्मारक उभारण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. आता जागा मंजूर झाल्यामुळे पुतळ्याचे काम लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे.
धाराशिव शहरातील शासकीय दुध डेअरीच्या जागेमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारावा ही अनेक दिवसांपासूनची मागणी होती. या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाकडे तसा अधिकृत प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यासाठी सातत्यपुर्ण पाठपुरावा केल्यामुळे आज या ऐतिहासिक दिवशी मागणीला यश आले आहे.
दुग्धविकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या शासकीय दुध शितकरण केंद्राची सर्व्हे नं.426 मधील एक एकर जागा साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे हस्तांतरित करण्यासाठी महसुल व वन विभागास जमीन प्रत्यार्पित करण्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व स्मारक उभारण्यासाठी यापूर्वीच एक कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन घेतला असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले