धाराशिव: धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) चा उमेदवार निवडून येईल, असा दावा शिवसेना (शिंदे गट) मध्ये नव्याने प्रवेश केलेले सुधीर पाटील यांनी केला आहे. त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करताच आयोजित पत्रकार परिषदेत हा दावा केला. त्यांच्या या विधानामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये मतदारसंघ वाटपावरून तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युती अखंड होती. , ज्यात शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील निवडून आले होते. सध्या कैलास पाटील शिवसेना (ठाकरे गट) मध्ये आहेत. ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील विभाजनामुळे मतदारसंघातील राजकीय गणिते बदलली आहेत.
धाराशिव – कळंब विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा गड आहे. आपण स्वगृही परतलो असून, शिवसेनेचा जिल्हाप्रमुख काम केल्यामुळे आपणास मतदारसंघाची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून चार जण इच्छुक असल्याचे सुधीर पाटील यांनी सांगितले आहे. त्यांनीही या निवडणुकीत उमेदवारी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. उमेदवारीवर डोळा ठेवूनही सुधीर पाटील यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले आहे.
धाराशिव-कळंब मतदारसंघ भाजपला दिला गेल्यास शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे, आगामी निवडणुकीत या मतदारसंघात कोणती राजकीय समीकरणे आकार घेतील, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शिवसेना ( शिंदे गट ) इच्छुक – सूरज साळुंके, धनंजय सावंत, नितिन लांडगे, सुधीर पाटील
भाजप इच्छूक – नितीन काळे, दत्ता कुलकर्णी, अजित पिंगळे, मल्हार पाटील
ता. क. – सुधीर पाटील शिवसेनेत ( शिंदे गट ) गेल्यानंतर भैय्या आणि आप्पाचा शिंदे गटात जाण्याचा विचार बदलला आहे.