तुळजापूर: “पाच वर्षात एकही झाड लावले नाही,” अशी धक्कादायक माहिती अधिकारात (RTI) देणाऱ्या तुळजापूर सामाजिक वनीकरण विभागाचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. एकीकडे वृक्षारोपण ‘निरंक’ असल्याचे अधिकृतपणे कळवले जात असताना, दुसरीकडे शासनाची दिशाभूल करण्यासाठी सिंदफळ (ता. तुळजापूर) शिवारात तब्बल २२ हजार झाडे लावल्याचा फलक लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते सुधीर जमदाडे यांनी हा प्रकार उघडकीस आणला असून, हा केवळ कागदोपत्री काम दाखवण्यासाठी आणि फोटो सेशन करण्यासाठी लावलेला खोटा फलक असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
आज (दि. २२ ऑक्टोबर) रोजी सिंदफळ येथील गट नंबर १८४ मध्ये सामाजिक वनीकरण विभागाचा एक फलक आढळून आला आहे. या फलकावरील माहिती धक्कादायक आहे. फलकावरील माहिती काय सांगते?
- विभाग: महाराष्ट्र शासन, सामाजिक वनीकरण विभाग उस्मानाबाद
- ठिकाण: गाव – सिंदफळ, गट क्र. १७४, परिक्षेत्र – तुळजापूर
- क्षेत्र: १० हेक्टर + ४ हेक्टर
- रोपसंख्या: १६००० +६४००
- लागवड वर्ष: सन २०२२
RTI मधील माहिती काय सांगते?
याउलट, तुळजापूर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते हेक्टर जमदाडे यांनी १० सप्टेंबर २०२५ रोजी सामाजिक वनीकरण विभागाकडे मागील ५ वर्षातील (२०२० ते २०२५) वृक्षारोपणाची माहिती मागवली होती. त्याला विभागाने ७ ऑक्टोबर २०२५ रोजी अधिकृत लेखी उत्तर दिले. या उत्तरात, “मागील ५ वर्षांत या कार्यालयामार्फत तुळजापूर तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वृक्षारोपणाचे काम करण्यात आलेले नाही,” असे स्पष्ट म्हटले होते. त्यामुळे लागवड, खर्च, आणि जिवंत झाडांची माहिती ‘निरंक’ असल्याचे विभागानेच लेखी स्वरूपात कबूल केले होते.’निरंक’ माहिती विरुद्ध २२ हजार झाडेआता या नवीन फलकामुळे मोठा संभ्रम आणि विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
१. जर सन २०२२ साली (जे मागील ५ वर्षातच येते) सिंदफळ येथे गट क्र. १७४ मध्ये २२ हजार रोपांची लागवड झाली होती, तर मग माहिती अधिकारात ‘काम निरंक’ (NIL) आहे, अशी खोटी माहिती का दिली?
२. आणि जर माहिती अधिकारातील उत्तर खरे असेल (म्हणजे एकही झाड लावले नसेल), तर मग हा २२ हजार झाडांचा शासकीय फलक कोणाच्या आदेशाने आणि कोणत्या हेतूने लावला?
३. केवळ फलक लावून वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि शासनाची दिशाभूल करण्याचा हा प्रकार आहे का? या प्रकारामुळे, प्रत्यक्षात कोणतेही काम न करता केवळ फलक लावून शासकीय निधी हडप करण्याचा किंवा खोटे रेकॉर्ड तयार करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
कार्यालयात शुकशुकाट, मग कर्मचारी जातात कोणत्या ‘फिल्ड’वर?