बेंबळी : शेतकऱ्यांच्या शेतातील साहित्याला लक्ष्य करत चोरट्यांनी आता सोलार पंपांवर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. धारूर (ता. जि. धाराशिव) येथील शिवारातून एका विहिरीवरील १ लाख २० हजार रुपये किमतीची सोलार मोटर चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश गोपिनाथ पवार (वय ३२, रा. धारूर) हे अभय मनोहर गायकवाड (रा. खामसवाडी) यांची धारूर शिवारातील गट नं. ४०९ मधील जमीन बटईने करतात. या शेतातील सामाईक विहिरीवर के.एस.बी. (KSB) कंपनीची ५ एच.पी. क्षमतेची सोलार मोटर बसवण्यात आली होती.
दिनांक ८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजल्यापासून ते १२ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने ही १ लाख २० हजार रुपये किमतीची मोटर चोरून नेली. शेतात गेल्यावर मोटर जागेवर नसल्याचे लक्षात आल्यानंतर शोधाशोध करण्यात आली, मात्र ती मिळून आली नाही.
याप्रकरणी प्रकाश पवार यांनी १४ डिसेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून बेंबळी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बेंबळी पोलीस करत आहेत.






