उमरगा : उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे विश्वासाचा गैरफायदा घेत गोदामातून तब्बल ५४ क्विंटल सोयाबीन चोरून त्याची परस्पर विक्री करत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमका प्रकार काय?
फिर्यादी दीपक प्रभाकर काळे (रा. गुंजोटी, ता. उमरगा, जि. धाराशिव) यांचे बाहेरपेठ गुंजोटी येथे पत्र्याचे शेड (गोदाम) आहे. यामध्ये त्यांनी सोयाबीनची २०० पाकिटे साठवून ठेवली होती. आरोपी ज्ञानेश्वर खंडू काळे (रा. गुंजोटी) याने दीपक काळे यांच्याकडून विश्वासाने या गोदामाची चावी घेतली होती.
मात्र, या विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीने २१ जानेवारी २०२६ ते २९ जानेवारी २०२६ या कालावधीत गोदामातील २०० पाकिटांपैकी ९० पाकिटे (एकूण ५४ क्विंटल सोयाबीन) एका पिकअप वाहनातून चोरून नेली. या सुमारे २ लाख ७० हजार रुपये किमतीच्या सोयाबीनची परस्पर विक्री करून आरोपीने दीपक काळे यांची मोठी आर्थिक फसवणूक केली.
पोलिसांत गुन्हा दाखल
आपला विश्वासघात आणि फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दीपक काळे यांनी उमरगा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून (FIR) सोमवारी, दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी आरोपी ज्ञानेश्वर काळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६ (२) अन्वये फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उमरगा पोलीस करत आहेत.






