नागपूर: राज्य मंत्रिमंडळाचा महाविस्तार रविवारी उपराजधानी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडला. या विस्तारात ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा समावेश असलेल्या या मंत्रिमंडळात विविध वयोगट, शैक्षणिक पात्रता आणि आर्थिक स्थितीचे प्रतिनिधित्व दिसून आले.
गुन्हेगारी पार्श्वभूमी: २३ मंत्र्यांवर गुन्ह्यांची नोंद
शपथ घेतलेल्या ३९ मंत्र्यांपैकी २३ जणांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. भाजपचे नितेश राणे यांच्यावर सर्वाधिक ३८ गुन्हे नोंद असून, मेघना बोर्डीकर (१२) आणि प्रताप सरनाईक (९) यांच्यावरही गुन्ह्यांची नोंद आहे. याउलट १६ मंत्र्यांवर एकही गुन्हा नाही.
शैक्षणिक पात्रता: मंत्रीमंडळातील विविधता
मंत्रिमंडळातील शैक्षणिक स्तरात लक्षणीय विविधता आहे. ९ मंत्री बारावीपर्यंत शिक्षित असून, २ जण दहावी पास आहेत. भरत गोगावले हे फक्त आठवी पास असलेले सर्वांत कमी शिक्षित मंत्री आहेत. १८ मंत्री पदवीधर, ५ पदव्युत्तर शिक्षित, तर ४ जणांकडे पदविका आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ७ वकील आणि पंकज भोयर हे डॉक्टरेट मिळवलेले एकमेव मंत्री आहेत.
वयोमान: नाईक सर्वात ज्येष्ठ, अदिती सर्वात तरुण
७४ वर्षीय गणेश नाईक हे मंत्रिमंडळातील सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत, तर ३६ वर्षीय अदिती तटकरे या सर्वांत तरुण मंत्री आहेत. अदिती तटकरे यांची ही दुसरी मंत्रीपदाची टर्म आहे.
आर्थिक स्थिती: लोढा सर्वाधिक श्रीमंत, भुसे सर्वाधिक गरीब
भाजपचे मंगलप्रभात लोढा हे ४४७ कोटींहून अधिक संपत्तीमुळे मंत्रिमंडळातील सर्वाधिक श्रीमंत मंत्री आहेत. त्यांच्यानंतर प्रताप सरनाईक (३३३ कोटी) आणि शिवेंद्रराजे भोसले (१२८ कोटी) यांचा क्रमांक लागतो. दुसरीकडे, दादा भुसे हे फक्त १ कोटी ६० लाख रुपये संपत्तीमुळे सर्वांत गरीब मंत्री ठरले आहेत.