तामलवाडी : राष्ट्रीय महामार्गावर रहदारीस धोका निर्माण होईल अशा पद्धतीने ऑटो रिक्षा उभी केल्याप्रकरणी तामलवाडी पोलिसांनी एका चालकावर गुन्हा दाखल केला आहे. महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याने ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मसा अशोक कसबे (वय ४७, रा. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. ही घटना सोमवारी, १४ जुलै २०२५ रोजी सकाळी ११:४५ वाजण्याच्या सुमारास घडली.
आरोपी कसबे यांनी त्यांची ऑटो रिक्षा (क्र. एमएच १३ ईएफ २४८४) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर बालाजी अमाईन्सजवळ सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभी केली होती. गस्तीवर असलेल्या तामलवाडी पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आली.
यानंतर, पोलिसांनी स्वतः सरकारतर्फे फिर्याद देऊन चालक मसा कसबे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २८५ (सार्वजनिक मार्गात अडथळा किंवा धोका निर्माण करणे) अन्वये तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.