तामलवाडी: धाराशिव जिल्ह्यातील तामलवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध धंद्यांवर मोठी कारवाई केली आहे. शासनाने प्रतिबंध केलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखूची चोरून विक्री करण्यासाठी घरात साठा करणाऱ्या एका इसमावर पोलिसांनी छापा टाकला असून, या कारवाईत सुमारे ९७ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. ४) दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास तामलवाडी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गंजेवाडी (ता. तुळजापूर) येथे राहणाऱ्या रमेश नागनाथ गंजे (सध्या रा. तामलवाडी) याच्या घरावर छापा टाकला.
झडती दरम्यान आरोपीच्या घरात शासनाने महाराष्ट्रात प्रतिबंधित केलेला ‘डायरेक्टर पान मसाला’, ‘प्रीमियम टोबॅको’, ‘विमल पान मसाला’, आणि ‘व्ही-१ तंबाखू’ असा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी हा सर्व माल जप्त केला असून त्याची एकूण किंमत ९७,१४० रुपये इतकी आहे.
याप्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात रमेश नागनाथ गंजे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम २६ (२)(i), २६(२)(iv), २७ (३)(९) आणि ३०(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तामलवाडी पोलीस करत आहेत.






