धाराशिव जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दोन जागा पटकावत जरी जोरदार घोषणा दिल्या होत्या, तरी मंत्रीमंडळ विस्तारात मात्र धाराशिवच्या पदरात ‘वाटाण्याच्या अक्षता’ पडल्या आहेत. मंत्रीमंडळाच्या या ‘सहनशक्ती परीक्षेत’ धाराशिवचे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील अपयशी ठरले आहेत.
सावंत यांचे मंत्रीपद ‘निसटलेले आरोग्य’
माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना मंत्रीपदाचा डच्चू मिळाल्याने ते नागपूर सोडून पुण्यात दाखल झाले आहेत. त्यांच्या ऑफिसकडून मिळालेल्या माहितीनुसार, सावंत यांचे आरोग्य ‘चांगलेच बिघडले’ असून, त्यांना मंत्रीपद न मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांचे रक्तदाब वाढवत असल्याचे कळते.
“सावंतांचं दुःख मोठं की पत्रकारांचं?”
खरं तर, सावंत यांना जेवढं दुःख मंत्रीपद न मिळाल्याने झालं नसेल, त्याहून अधिक दुःख धाराशिवच्या दोन पत्रकारांना झालं आहे. या पत्रकारांनी मंत्रीपद मिळणार असल्याचा इतका जोरदार ‘ढोल वाजवला’ की ते स्वतःच सावंत यांचे पीए वाटू लागले होते. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांनी मंत्रीपदाबाबत आश्वासन दिल्याच्या व्हिडीओंचा ‘ब्रेकिंग न्यूज फेस्टिव्हल‘ या पत्रकारांनी साजरा केला होता. कोटवाल्या पत्रकाराने तर uncut व्हिडीओ म्हणत सावंतांची पॅकेज आरती करत त्यांना मंत्रिपद कसे फिक्स आहे,असे सांगितले होते. पण मीडियात बातम्या आल्या म्हणजे मंत्रीपद मिळतेच असे नसते, हे मंत्रीमंडळ विस्ताराने पुन्हा सिद्ध केले.
राणा साहेबांचा ‘स्माईल’ कायम, पण निराशाही तीच
तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना यंदाही निराशेचा चहा प्यायला लागला आहे. त्यांचा ‘हमेशा स्माईल’ असलेला चेहरा जरी ‘फिट’ दिसत असला तरी, आतून ते स्वतःलाच विचारत असतील, “पद मिळवायचं की अजून वाट पाहायची?”
धाराशिवकरांची ‘हात हलवत’ प्रतिक्रिया
धाराशिवकर मात्र यावर चांगलेच नाराज दिसत असून, “आमचं जिल्हा नाव बदलून मंत्रीमंडळात स्थान मिळेल का?” असा सवाल करत आहेत. तर काही जण, “सावंत आणि राणा यांना आता राजकीय ‘डॉक्टर’ दाखवण्याची गरज आहे,” अशी मिश्किल प्रतिक्रिया देत आहेत.
संपूर्ण मंत्रीमंडळ विस्तारात धाराशिवचं योगदान – ‘केवळ हवा आणि निराशा’
तर, या संपूर्ण नाट्यमय घडामोडीत धाराशिव जिल्ह्याने फक्त आश्वासनांचा हवेचा फुगा सोडला आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीत न आल्याने ‘हवा गळाली’. मंत्रीपदाऐवजी ‘नसलेलं आरोग्य’ आणि ‘घसरलेली आशा’ एवढंच पदरात आलं.
– बोरूबहाद्दर