पक्याः “अरे भावड्या, ऐकलंस का? निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत. धाराशिव जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघात चांगलाच गोंधळ माजलाय.”
भावड्याः (उत्सुकतेने) “हो पक्या, ऐकलं. परंडा, धाराशिव, तुळजापूर, उमरगा सगळ्या मतदारसंघात जोरदार चर्चा चाललीये. कोण कसा खेळ मांडतोय, हे बघायला मजा येणार.”
पक्याः (कुतुहलाने) “आमच्या परंड्यात तानाजी सावंत साहेब आहेत. शिंदे गटात गेलेत. आता उद्धव ठाकरे साहेब कंबर कसतायत त्यांना पाडायला. पण, कोण उभा करणार त्याच्याविरुद्ध, हे अजून कळत नाही.”
भावड्याः (विचारत) “म्हणजे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील ठाकरे गटात असून इच्छुक आहेत. आणि राष्ट्रवादीचे राहुल मोटे साहेब परंड्यात कसा विचार करणार, हे अजून गुलदस्त्यात.”
पक्याः ( गंभीरपणे) “हो भावड्या, यंदा शिवसेनेतली फूट पडलीय. शिंदे गट आणि ठाकरे गट, दोघंही आपापल्या ताकदीने लढणार. महाविकास आघाडी आणि महायुतीचा जोर असणार.”
भावड्याः (हसत) “पक्याऽऽ, या खेळात आपलं काय? आपल्याला फक्त तमाशा बघायचा. कोण जिंकतं, कोण हरतं, ते पाहायला मजा येणार. राजकारणात कोण कुठे आणि कसं फिरतं, हे तर अगदीच रोचक असतं!”
पक्याः (हसत) “हो, भावड्या, राजकारणात तसंच चालतं. बदलणारं राजकारण आणि खेळातले बदल हेच खरे तमाशे! आपल्या धाराशिवच्या भूमीत या वेळेस काय घडणार, हे पाहायला आपण तयार असूया!”
( “गोफणगुंडा” सदराचे लेखक आहेत, धाराशिव लाइव्हचे संपादक सुनील ढेपे )