धाराशिव: जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, एकाच दिवशी मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांत दोन वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या झाल्याचे उघडकीस आले आहे. ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरासमोरून शेळ्या चोरीला गेल्या आहेत, तर लोहारा हद्दीत शेतकऱ्याच्या शेतातील विद्युत साहित्यावर डल्ला मारण्यात आला आहे. या दोन्ही घटनांमध्ये एकूण ४३ हजार ९५० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे:
घरासमोरून २२ हजारांचे पशुधन चोरीला
ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुळेवाडी (ता. जि. धाराशिव) येथे घरासमोर बांधलेल्या शेळ्या चोरीला गेल्याची घटना घडली आहे. फिर्यादी दत्तात्रय देविदास मुळे (वय ५३ वर्षे, रा. मुळेवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. २९ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरासमोरून अज्ञात चोरट्याने एक बोकड, एक शेळी आणि एक पिल्लू असे एकूण २२ हजार रुपये किमतीचे पशुधन चोरून नेले. याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकऱ्याच्या विहिरीवरील केबल लंपास
दुसऱ्या घटनेत, लोहारा तालुक्यातील धानूरी येथे शेती साहित्याची चोरी झाली आहे. फिर्यादी संभाजी वागंबर मुसांडे (वय ४६ वर्षे, रा. धानूरी, ता. लोहारा) यांच्या शेत गट नं. ५५१ मधून अज्ञात चोरट्याने बोअरच्या मोटरची १४३ मीटर केबल आणि ॲटोस्विच असा एकूण २१ हजार ९५० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दोन्ही ठिकाणी पोलीस पुढील तपास करत आहेत. शेतकऱ्यांनी आपली जनावरे आणि शेती साहित्याची काळजी घेण्याचे आवाहन यानिमित्ताने केले जात आहे.







