धाराशिव: जिल्ह्यात चोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून, विविध ठिकाणी घरफोडी, वाहनचोरी, आणि शेती साहित्याच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांत लोहारा, तामलवाडी, बेंबळी, येरमाळा आणि वाशी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या सर्व घटनांप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विविध पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांचा तपशील:
- लोहारा: बंद घराचे कुलूप तोडून लाखोंचा ऐवज लंपास
समुद्राळ (ता. उमरगा) येथील शिवाजी गहिनीनाथ कोकाटे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी आत प्रवेश केला. घरातील २५ ग्रॅम सोन्याचे दागिने, चौदा तोळे चांदीचे दागिने आणि २७,००० रुपयांची रोकड असा एकूण ६७,७०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २८ जून ते २ जुलै दरम्यान घडली असून, याप्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- तामलवाडी: मोटारसायकल आणि कॉपर वायरची चोरी
तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या दोन मोठ्या घटना घडल्या. सुरतगाव येथून शिवाजी गोपाळ बनसोडे यांची ७०,००० रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. एमएच ३८ एएच ९९९४) अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. तर दुसऱ्या घटनेत, केमवाडी येथील एका कंपनीच्या साईटवरून १,०८,००० रुपये किमतीचे ३०० किलो वजनाचे कॉपर वाईंडिंगचे १५ बंडल आणि इतर साहित्य चोरीला गेले. चोरांनी ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल सांडून मोठे नुकसानही केले आहे. या दोन्ही प्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
- बेंबळी: घरासमोरून ८० हजारांची मोटारसायकल पळवली
बेंबळी येथे घरासमोर लावलेली शहाजेद पिरपाशा पटेल यांची ८०,००० रुपये किमतीची युनिकॉर्न मोटारसायकल (क्र. एमएच २५ बीबी ८६६०) अज्ञात चोराने चोरून नेली. ही घटना ४ जुलैच्या रात्री घडली असून, बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
- येरमाळा: शेतातील दीड लाखांची ॲल्युमिनियम वायर चोरीला
बाभळगाव (ता. कळंब) येथील शेतकरी औदुंबर कैलासराव पाटील यांच्या शेतातील विद्युत खांबावरील सुमारे दीड लाख रुपये किमतीची ७०० मीटर लांबीची ॲल्युमिनियम वायर अज्ञात चोरांनी कापून नेली. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- वाशी: दोन महिलांनी ३० हजारांच्या शेळ्या चोरल्या
तांदळवाडी (ता. वाशी) शिवारातून बळीराम तुकाराम गायकवाड यांच्या ३०,००० रुपये किमतीच्या तीन शेळ्या चोरीला गेल्या. याप्रकरणी शालन चंदर पवार आणि आशाबाई बापुराव शिंदे (दोघी रा. तांदुळवाडी) या दोन महिलांवर चोरीचा आरोप असून, वाशी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात एकाच वेळी विविध ठिकाणी घडलेल्या या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांसमोर चोरांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. पोलीस या सर्व प्रकरणांचा अधिक तपास करत आहेत.