धाराशिव जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट झाला असून, कळंब आणि धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन मोठ्या चोऱ्यांच्या घटना घडल्या आहेत. एका घटनेत सिमेंट विट उद्योगाचे दुकान फोडून ४४ हजार रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला, तर दुसऱ्या घटनेत शेतकऱ्याची मोटारसायकल आणि शेतीउपयोगी साहित्य असा एकूण ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या दोन्ही घटनांप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कळंबमध्ये दुकानातून ४४ हजारांची चोरी
कळंब येथील बाबा नगर रोड परिसरात असलेल्या ‘भराडे सिमेंट विट उद्योग’ या दुकानात चोरीची घटना घडली आहे. फिर्यादी दत्तात्रय विठ्ठल भराडे (वय ५५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक १२ सप्टेंबर रोजी रात्री ८ ते १३ सप्टेंबर रोजी सकाळी ८:३० च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातून ट्रॅक्टरची हायड्रोलिक असेंब्ली, ५० फूट वायर आणि सिमेंट बनवण्याच्या २५० लोखंडी प्लेट्स असा एकूण ४४,००० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी दत्तात्रय भराडे यांनी १३ सप्टेंबर रोजी कळंब पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४) आणि ३०५(अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
धाराशिव ग्रामीण भागात शेतातून ३८ हजारांचा ऐवज लंपास
दुसरी घटना धाराशिव तालुक्यातील पवारवाडी शिवारात घडली. येथील शेतकरी विशाल सुनील मुंढे (वय ३१) यांच्या शेतातून मोटारसायकलसह शेतीचे साहित्य चोरीला गेले आहे. दिनांक ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:३० ते ७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतातून एमएच २५ ए.वाय. ३५८७ क्रमांकाची २५,००० रुपये किमतीची हिरो होंडा मोटारसायकल, पाणबुडी, स्प्रिंकलरच्या चार चिमण्या आणि १०० मीटर केबल असा एकूण ३८,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी विशाल मुंढे यांनी १३ सप्टेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस चोरांचा शोध घेत आहेत.