धाराशिव: गेल्या आठ महिन्यांपासून धाराशिव जिल्ह्यात वास्तव्यास असलेला पट्टेरी वाघ आज (गुरुवारी ) रोजी धाराशिव तालुक्यातील वरवंटी शिवारात शेतकऱ्यांना दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतात काम करणाऱ्या काही शेतकऱ्यांनी वाघाला पाहिल्यानंतर तातडीने इतरांना माहिती दिली. या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून, वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी वरवंटी शिवारात काही शेतकरी आपल्या शेतकामात व्यस्त असताना त्यांना अचानक वाघाचे दर्शन झाले. क्षणार्धात ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली आणि नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. अनेकांनी खबरदारीचा उपाय म्हणून शेतातील कामे थांबवून घराकडे धाव घेतली. या घटनेनंतर काही वेळातच वाघाच्या वावराचा एक व्हिडिओ समोर आल्याने या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे एक पथक तात्काळ वरवंटी शिवारात दाखल झाले. पथकाने परिसराची पाहणी करून वाघाच्या पायांचे ठसे शोधण्यास सुरुवात केली आहे. तसेच, ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. वन विभागाने परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि एकट्याने शेतात किंवा घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
सहा महिन्यांपासून जिल्ह्यातच वास्तव्य
हा वाघ गेल्या सुमारे आठ महिन्यांपासून धाराशिव जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये वावरत असल्याचे वन विभागाच्या नोंदींवरून स्पष्ट होते. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून बाहेर पडून हा वाघ धाराशिव जिल्ह्यात दाखल झाला होता. सुरुवातीला येडशी येथील रामलिंग अभयारण्यात त्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर जिल्ह्यातील इतर अनेक गावांमध्ये आणि शेतशिवारांमध्ये त्याचा वावर आढळून आला होता. वन विभागाने या वाघाला पकडण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले, मात्र तो हुलकावणी देत होता. आता पुन्हा एकदा धाराशिव तालुक्यातच त्याचे दर्शन झाल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. वन विभागाकडून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Video