धाराशिव – येडशी अभयारण्यातून बाहेर पडलेला वाघ अद्यापही धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याच्या सीमेवर मुक्त संचार करीत आहे. चार दिवसांपूर्वी पांढरी (ता. बार्शी) येथे एका गाईवर हल्ला केल्यानंतर वाघाची उपस्थिती लक्षात आली होती. त्यानंतर येडशी अभयारण्यात ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर आता तो बार्शी तालुक्यातील ढेंबरेवाडी तलावाच्या परिसरात दिसून आला आहे.
वाघाच्या संचारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वाघाला पकडून यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात सोडण्याची मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.
वनविभाग काय करत आहे?
वनविभागाचे तीन तालुक्यांतील अधिकारी १५ ट्रॅप कॅमेऱ्यांच्या सहाय्याने वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. वाघ गावात शिरू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. सध्या वाघाला पकडण्याचे आदेश नसल्याने केवळ त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे, असे धाराशिवचे विभागीय वन अधिकारी बी. ए. पोळ यांनी सांगितले.
नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन
वनविभागाने नागरिकांना घाबरून न जाता खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. पाळीव प्राण्यांना बंदिस्त गोठ्यात बांधावे, जनावरांना चारण्यासाठी नेऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. वाघाचा हल्ला झाल्यास बचाव कसा करावा यासाठी सोलापूर आणि धाराशिवच्या रेस्क्यू टीमला प्रशिक्षण देण्यात आले आहे.
तुळजापूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, कामठ्यात वासरू ठार
तुळजापूर तालुक्यातील कामठा येथे सोमवारी मध्यरात्री बिबट्याने एका वासराला ठार मारले आहे. लक्ष्मण दादाराव साळुंखे या शेतकऱ्याच्या गोठ्यातील या वासरावर बिबट्याने हल्ला केला. हा गोठा कामठा येथील फॉरेस्टजवळ असल्याने, झाडीतून आलेल्या बिबट्याने वासराला ठार केले असावे, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनरक्षक अधिकारी विनोद पाटील आणि मधुकर घोरपडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचनाम्यातून हा हल्ला बिबट्यानेच केल्याची खात्री झाली आहे.
वनविभागाने नागरिकांना सतर्क राहून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. बिबट्या रात्रीच्या वेळी शिकारीसाठी सक्रिय होत असल्याने, विशेषतः सायंकाळ आणि रात्रीच्या वेळी नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
वनविभागाचे अधिकारी विनोद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबट्याचा वावर खात्रीलायकपणे अंदाज लागल्यानंतर वरिष्ठांच्या सूचनांनुसार योग्य ठिकाणी पिंजरा लावण्यात येईल.