धाराशिव: पोदार इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्याच्या अपघाती मृत्यूनंतर धाराशिवकरांनी केलेल्या रास्तारोको आंदोलनाला यश आले आहे. एनएचएआय आणि आयआरबी कंपनीने दिलेल्या आश्वासनानुसार पोदार स्कूल ते जुना उपळारोडपर्यंत सर्विस रोडचे काम मुदतीत पूर्ण झाले आहे.
धाराशिवकरांनी १२ डिसेंबर रोजी डी-मार्टसमोर तब्बल दीड तास रास्तारोको आंदोलन केले होते. १५ दिवसांत सर्विस रोडचे काम पूर्ण करावे अशी मागणी आंदोलकांनी केली होती. त्यानंतर कंपनीने २५ डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, कंपनीने मुदतीपूर्वी २१ डिसेंबर रोजीच काम पूर्ण केले.
यामुळे पोदार स्कूल, डी-मार्ट आणि जुना उपळा रोड परिसरातील अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. नागरिकांनी सर्विस रोडचा वापर करावा आणि महामार्गावर विरुद्ध दिशेने प्रवास करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, रेल्वे स्टेशन ते तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूचा सर्विस रोड २८ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. त्याचबरोबर आवश्यक ठिकाणी गतिरोधक, पथदिवे आणि विकास नगर येथील अंडरपासचे काम पूर्ण करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. जुना उपळा रोड येथील अंडरपाससाठी संबंधीत विभागाकडे रीतसर प्रस्ताव पाठवावा, असेही शिवसेना शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी म्हटले आहे.