(धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून धो धो पाऊस कोसळतोय. सगळीकडे पाणीच पाणी झालंय आणि शेतकरी काळजीत आहेत. अशाच एका पावसाळी संध्याकाळी, गावच्या पारावरच्या पत्र्याच्या शेडखाली बसून पक्या, भावड्या आणि पेंद्या हातावर तंबाखू मळत आहेत…)
पक्या: (हातावर तंबाखू मळता मळता) च्यायला, एका आभाळानं रडवून ठेवलंय… अन् तिकडं माणसंच आभाळ फाडायला निघालीत!
भावड्या: (काळजीच्या सुरात) खरंय तुझं… या पावसानं पार वाट लावलीय पिकांची. पण तू माणसांचं काय काढलंस मधीच?
पक्या: आरं, माणसांचं संकट त्याहून मोठं हाय. आपल्या तुळजापूरच्या आईभवानीच्या देवळाचं शिखरच पाडणार हाय म्हणे सरकार!
पेंद्या: (तोंडातला तंबाखू थुंकून) काय? शिखर? मंग आई पावसात भिजल की रं! तिला वर पत्र्याचं शेड तरी टाकत्यात का न्हाई?
भावड्या: (पेंद्याच्या डोक्यात टपली मारत) आरं येड्या, शिखर पाडणार म्हणजे काय घरातलं छप्पर हाय व्हय ते? मोठी भानगड हाय ती. तो आपला आमदार हाय ना… राणा पाटील… त्यानं काहीतरी काडी लावलीय.
पक्या: व्हय व्हय! तोच… च्यायला, आधी त्यो ड्रग्ज वाल्यांकडून सत्कार घेतो, मंग आईची तलवार इकडंतिकडं ठेवतो, आता थेट शिखरावरच घाव घालतोय! लय मस्ती आलीय बग त्याला.
भावड्या: पण झालंय काय नेमकं? कोण म्हणालं पाडायचं?
पक्या: आरं, त्या ओमराजेंनी एक ‘फिडो’ (व्हिडिओ) दावलाय. त्यात राणा पाटील स्वतःच्या तोंडानं म्हणतोय, “शिखर पाडावं लागेल.” मंग काय, भाजपवाल्यांची पळापळ झाली. त्यांनी दुसरी ‘फिडो’ आणली अन् म्हणले, “तुम्ही अर्धीच बघितली, ही बगा पुरी…”
पेंद्या: मंग? पुरी ‘फिडो’ बघून काय झालं? शिखर जागच्या जागी हाय का गेलं?
पक्या: (हसून) आरं पुरी बघितली तरी त्यातबी तेच म्हणतोय, “शिखर पाडावं लागेल.” फक्त पुढं मागं चार शब्द जास्त चिकटवलेत! नुसती धुळफेक चाललीय बग.
भावड्या: मंग तो पत्तरकार कायतरी इचारत होता ना? त्याचं काय झालं?
पक्या: व्हय! एकानं बरोबर बोट ठेवलं. त्यो म्हनला, “आरं बाबांनो, फिडो अर्धी असो का पुरी, शिखर पाडायचं का न्हाई तेवढं सांगा की! तुम्ही बाजूने हाय का विरोधात?” तर त्यावर गडी काय म्हणतोय, “हे षडयंत्र हाय… अजून अहवाल यायचा हाय…” च्यायला, सरळ उत्तरच द्यायचं न्हाई.
भावड्या: ह्ये तर तसलंच झालं की… रोग म्हशीला अन् इंजक्शन पखालीला! मूळ मुद्दा सोडून भलतीच बोंबाबोंब.
पेंद्या: सोळाशे कोटी रुपये मंजूर झालेत म्हणत्यात ना विकासाला? मंग त्या पैशात शिखर अजून उंच बांधायचं सोडून पाडायला का निघालेत हे? मला तर वाटतंय, शिखर पाडून तिथं सपाट मैदान करायचं असल… अन् त्या मैदानावर हेलिकॉप्टर उतरायची सोय करायची असल मोठमोठ्या लोकांची!
पक्या: (कपाळावर हात मारून) आरं काहीबी काय तुझं! पण एक खरंय, ह्याच्याआधी चव्हाण मंत्री होते, खपले आमदार होते… कुणी देवळाच्या कारभारात एवढी ढवळाढवळ केली न्हाई. ह्यास्नीच लय किडा हाय.
भावड्या: खरंय तुझं! पैसं खायची नवी जागा दिसली असल. पण एक लक्षात ठेवा… लय फडफड करू नये. आई मागं लागली की आमदाराची आमदारकी अन् भल्याभल्यांची मस्ती एका मिनटात उतरते!
पेंद्या: ते खरंय… आईचा नाद लय वाईट! शिखर पाडलं तर आई खाली उतरून पारावर आपल्या संग बसायला येईल… अन् मंग ह्यास्नी प्रसाद म्हणून आपटल्याशिवाय राहणार न्हाई!
(तिघेही खदाखदा हसतात आणि तोंडाला तंबाखू लावतात.)