(स्थळ – पेंद्याच्या घरासमोरील अंगण : पक्या धापा टाकत येतो)
पक्या: आरं भावड्या, पेंद्या… कुठं हायसा रं? ऐकलं का काय झालंय ते?
भावड्या: (जांभई देत) काय झालं रं पक्या? सकाळच्या पारी कुठं आभाळ फाटलंय? बस की जरा दम घे.
पेंद्या: (डोळे मिटून देवाचं नाव घेत असतो) …जय आंबे ,जय आंबे … बोल रं पक्या, काय झालंय?
पक्या: आरं आपल्या तुळजापूरच्या देवीच्या मूर्तीवरून रणकंदन सुरु झालंय रं… भलतंच! ती १०८ फुटाची मोठी मूर्ती उभी करणार हायेत ना, तिच्यावरून आता मोठं राजकारण पेटलंय.
भावड्या: मंग? त्यात काय नवीन हाय? आपल्याकडं राजकारणाशिवाय पान हलतंय व्हय? पन झालंय काय नक्की?
पक्या: आरं, ती मूर्ती दोन हातांची असावी का आठ हातांची, याच्यावरून मोठं भांडण लागलंय. आपले आमदार राणा पाटील म्हणत्यात आठ हातांची करा, पन पालकमंत्री सरनाईक आडवे आलेत. ते म्हणत्यात, “थांबा, तसलं काही चालणार न्हाई!”
पेंद्या: (डोळे उघडत) कायबी काय बोलू नगं पक्या! आपली आईसाहेब तर दोन हातात तलवार घेऊन राजांना आशीर्वाद देताना दिसतीया की… मंग आठ हात कुठून आले? आपल्या देव्हाऱ्यात पन तशीच मूर्ती हाय.
भावड्या: आरं पेंद्या, त्योच तर सगळा खेळ हाय. आपल्याला जी दिसतीया, ती दोन हातांची. पन खरा इतिहास म्हनितो की देवीचं मूळ रूप आठ हातांचं, म्हंजे अष्टभुजा हाय. आता खरं कुणाचं मानायचं?
पक्या: बराबर! अगदी बरोबर बोलला भावड्या. आता तर कागदपत्रात पन तसंच लिव्हलंय म्हनं. सरकारनं जे काम काढलंय, त्यात ‘अष्टभुजा’ मूर्तीच बनवायची असं साफ साफ लिव्हलंय.
(तेवढ्यात पेंद्याची बायको गंगी पाणी घेऊन येते)
गंगी: काय त्यो देवाधर्मावरून आरडाओरडा लावलाय सकाळच्या पारी! अरे मूर्ती दोन हाताची असू दे न्हाईतर आठ हाताची… तिथं भक्ती महत्त्वाची का हातांची संख्या?
पेंद्या: गंगे, तुला कळायचं न्हाई यातलं. ही श्रद्धेची गोष्ट हाय.
गंगी: (कंबरेवर हात ठेवून) व्हय व्हय, तुमचीच श्रद्धा जागी हाय. आधी मंदिरातल्या भिंतीला तडे गेलेत, त्याचं काय? देवीची तलवार चोरीला गेली म्हणतात, त्याचं काय झालं? मोठाल्या मूर्त्या उभ्या करण्याआधी, जे हाय ते तर नीट सांभाळा की!
भावड्या: (हसत) आरं पेंद्या, गंगी खरं बोलतीया बघ. आपलं राजकारणच येडं हाय. कामाचं सोडून फालतू वाद उकरून काढत्यात. आता म्हनं एका इतिहासवाल्यानं नवीनच सांगितलंय.
पक्या: व्हय व्हय, मी वाचलं की पेपरात. त्यो बलकवडे नावाचा मोठा मानूस हाय. त्यो म्हणतोय, “देवी काय डायरेक्ट तलवार देत न्हाई. तिची शक्तीच महाराजांच्या तलवारीत उतरली.” मंग मूर्ती तलवार देतानाची कशाला? फक्त आशीर्वाद देतानाची बनवा की!
पेंद्या: (विचारात पडतो) हं… हे पन खरंच की… देवीनं आशीर्वाद दिला, हेच तर खरं हाय.
गंगी: मंग झालं तर! उगाच हातांवरून भांडत बसण्यापेक्षा, आशीर्वाद देणारी मूर्ती बनवा की! लोकांना भक्ती करायला मिळेल आणि तुमची भांडणं पन मिटतील. चला, चहा टाकिते. तेवढं डोकं शांत होईल तुमचं.
(गंगी आत जाते)
भावड्या: बघितलंस पक्या, या बायास्नी जे कळतंय, ते आपल्या मोठाल्या पुढार्यांना कळत न्हाई.
पक्या: खरंय तुझं… आता बघूया, हे लोक देवीच्या हातांकडं बघत्यात का तिच्या आशीर्वादाकडं.
पेंद्या: (हात जोडत आभाळाकडे बघतो) आई तुळजाभवानी… तूच बघ आता काय खरं हाय ते! तुझ्याच नावानं बाजार मांडलाय यासनी.
- बोरूबहाद्दर