धाराशिव: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनाला येणाऱ्या लाखो भक्तांसाठी आता एक ‘गोड’ बातमी आहे. देवीचा प्रसाद कोणता, यावरची चर्चा आता संपली असून, भक्तांच्या हाती आता थेट पुण्याच्या सुप्रसिद्ध ‘चितळे बंधू’ यांच्या हातचा मोतीचूर लाडू प्रसाद म्हणून दिला जाणार आहे. तिरुपती बालाजी देवस्थानच्या धर्तीवर, तुळजाभवानी मंदिर संस्थानाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून, तसा करारही चितळे यांच्यासोबत करण्यात आला आहे.
बाकरवडी नव्हे, लाडवाचा मान!
पुण्याचे चितळे म्हटले की, डोळ्यासमोर येते ती जगप्रसिद्ध बाकरवडी! पण तुळजाभवानीच्या प्रसादासाठी मात्र बाकरवडीने नव्हे, तर त्यांच्याच मोतीचूर लाडवाने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे, हा लाडू जरी चितळे बनवणार असले तरी, त्याची चव कशी असेल, त्यात काय साहित्य असेल, हे मंदिर संस्थानचे विश्वस्त आणि पुजारी ठरवणार आहेत. त्यांच्या सूचनेनुसार खास रेसिपी तयार केली जाणार असल्याने, या प्रसादाला एक वेगळीच पारंपरिक आणि सात्विक चव असेल.
राजकीय अडथळा दूर, नव्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिला वेग!
हा लाडू प्रसादाचा निर्णय काही नवीन नाही. यापूर्वीचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या काळातही हा प्रस्ताव चर्चेत होता. मात्र, काही राजकीय दबावामुळे आणि नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे हे टेंडर पुढे जाऊ शकले नव्हते. आता धाराशिवचे नवे जिल्हाधिकारी आणि मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी सूत्रे हाती घेताच, या रखडलेल्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यांच्या पुढाकाराने सर्व अडथळे दूर झाले आणि अखेर आईच्या प्रसादाचा हा ‘गोड’ घाट निश्चित झाला आहे.
या निर्णयामुळे आता तुळजापूरला येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या हाती, आईचा आशीर्वाद म्हणून एक दर्जेदार आणि चविष्ट लाडू मिळणार आहे, ज्यामुळे भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांची बाईट ऐका