तुळजापूर: तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १ ते २ वाजण्याच्या सुमारास निंबाळकर दरवाज्यासमोरील होमच्या ठिकाणी घडली.
विजया नंदकुमार हत्तीकर (वय ५७, रा. कुंडल, ता. पलूस, जि. सांगली) यांनी याप्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, त्या दर्शनासाठी रांगेत उभ्या असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील बोरमाळ चोरून नेली. या बोरमाळेमध्ये ३५ मणी असून तिचे वजन ६ ग्रॅम आहे. बोरमाळेची किंमत ४० हजार रुपये असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र, अद्याप चोरटा हाती लागलेला नाही. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत.