तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीचा नवरात्र महोत्सव सुरु असल्यामुळे तुळजापूर नगरी भाविकांनी फुलून गेली आहे. मात्र प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे; हजारो भाविकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांमधून मोठ्या संख्येने भाविक शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. मात्र, मंदिर प्रशासनाच्या नियोजन शून्यतेमुळे आणि अव्यवस्थेमुळे भाविकांच्या धार्मिक आणि आध्यात्मिक अनुभवावर विपरित परिणाम होत आहे.
रविवारी, भाविकांची संख्या अधिक असल्यामुळे मंदिर परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळाली. यासोबतच, व्हीआयपी दर्शन आणि पेड दर्शनासाठी दिल्या जाणाऱ्या विशेष वेळेमुळे, फ्री दर्शनासाठी येणाऱ्या सामान्य भाविकांची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली. पहाटे ६ वाजल्यापासून रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना सायंकाळी ६ वाजेपर्यंतही दर्शन घेता आले नाही. पोलिस आणि मंदिर संस्थेच्या नातेवाईकांना मात्र थेट दर्शनाची मुभा देण्यात आली, ज्यामुळे सामान्य भाविकांत नाराजीचे वातावरण तयार झाले आहे.
याशिवाय, विश्रांतीसाठी दरवर्षी उघडले जाणारे कक्ष या वेळी उपलब्ध नसल्यामुळे भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्यासाठी उपलब्ध जागा, पाण्याची सोय, आणि इतर मूलभूत सुविधा पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे हजारो भाविकांची गैरसोय झाली आहे. दर्शनरांगेच्या सुरुवातीला, धर्मदर्शन, मुखदर्शन, आणि अभिषेक पूजेच्या स्वतंत्र रांगा असल्यामुळे गर्दीचे नियमन करण्यात काहीसा बदल दिसून आला आहे, पण तरीही प्रत्येक भाविकाला देवीचे दर्शन घेण्यासाठी ८ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो आहे.
ही परिस्थिती या शारदीय नवरात्र महोत्सवात पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. भक्तांच्या धार्मिक उत्साहावर आणि मंदिराच्या व्यवस्थापनावर या सर्व प्रकारांचा गंभीर परिणाम होत आहे. अशा गर्दीच्या वेळी प्रशासनाने अधिक नियोजनबद्ध उपाययोजना करणे आवश्यक आहे, परंतु यावेळी त्याचा अभाव दिसून आला आहे.
भाविकांमधून वाढती नाराजी व्यक्त होत असून, उत्साहाचे वातावरण कुठेच दिसत नाही. लोकांच्या श्रद्धेचा विचार करता, प्रशासनाने वेळीच नियोजन आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी आवश्यक पावले उचलली पाहिजेत. भाविकांसाठी विश्रांतीची सोय, योग्य दर्शनरांगा, व्हीआयपी दर्शनाची योग्य मर्यादा, आणि सुरक्षा यंत्रणा या गोष्टी प्रभावीपणे राबवणे महत्त्वाचे आहे. अन्यथा, श्रद्धेचा हा महोत्सव अव्यवस्थेच्या विळख्यात सापडेल.